Sharad Ponkshe : राजकीय नैराश्यामुळे राहुल गांधींची सावरकरांवर टीका; अभिनेते शरद पोंक्षे यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान ‘विनायक सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती’ अशी टीका केली. आणि त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले. (Sharad Ponkshe) त्यांच्या या वक्तव्याला केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक स्तरातून अनेक संघटनांनी विरोध केला. तसेच यामध्ये अभिनेते आणि सावरकरप्रेमी असलेले शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांचा अंदमानातील सेल्युलर जेलमधला व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. याबाबत अभिनेते शरद पोंक्षे यांनी एमपीसी न्यूजशी बातचीत करताना राहुल गांधी यांच्या अपयशातून या गोष्टी घडत असल्याची त्यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. जाणून घेऊया काय म्हणाले, शरद पोंक्षे –  

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान नाव घेत टीका केली होती. नेमकं याच वेळी अभिनेते शरद पोंक्षे कामानिमित्ताने अंदमानमध्येच होते. कट्टर सावरकरवादी असलेल्या शरद पोंक्षे यांनी त्यांचा या टिकेला उत्तर देण्याचे ठरवले व राहुल गांधी यांच्या सावरकारांविरोधातील वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमान येथील सेल्यूलर जेलमध्ये कैद केले होते. अनेक वर्षे याच कोठडीत त्यांच्यावर अनेक अमानुष अत्याचार करण्यात आले. याच जेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीतून शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी राहुल गांधींना एक दिवस या कोठडीत राहून दाखवण्याचे आव्हान दिले आहे.

अभिनेते तसेच सावरकरप्रेमी शरद पोंक्षे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आतोनात आदर आहे. असा सुपुत्र भारतमातेने जन्माला घातला.(Sharad Ponkshe) अशा व्यक्तिमत्वाला राहुल गांधी सारखी लायकी नसलेली माणसं…ज्यांना आपल्या आजीचा इतिहासही माहित नाही, त्यांनी हे बोलू नये. इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी देणगी दिली. वेळोवेळी त्यांनी  सावरकरांबद्दल गोरवोद्गार काढले, त्यांचे कौतुकही केले..हे म्हणजे राहुल गांधी आपल्या आजीलाच खोटे ठरवत असल्यासारखे झाले.

 

‘युवर मोस्ट ओबिडियन्ट सर्व्हंट’ असं म्हणून पत्राखाली सही करण्याची त्या काळातील प्रचलित पद्धत होती. त्यावरून कांगावा करीत राहुल गांधी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत, असे पोंक्षे म्हणाले. गांधी, नेहरू यांच्यासह समकालीन अनेक नेत्यांच्या पत्रांमध्येही तसा उल्लेख आढळतो, असा दावा त्यांनी केला.

त्याकाळी पत्राखाली लिहायची पध्दत Your Most Obedient servant

पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीत मिळालेलं यश, काँग्रेसची सत्ता जाणे, नोटबंदी व काँग्रेसचे एक एक घोटाळे बाहेर पडणे. हे सततचे येणारे अपयश पचवू शकत नसल्याने राहुल गांधी व काँग्रेस पक्ष टीका करत आहेत. सतत राग काढत आहेत. नरेंद्र मोदी हे कट्टर हिंदुत्ववादी असल्याने त्यांच्या विरोधात बोलता येत नाही. म्हणून आरएसएस व सगळ्या हिंदुच्या आदराचे स्थान असलेल्या वीर सावरकरांवर चिखलफेक करण्यात येत आहे व हिंदुना डिवचण्यात येत आहे. यातून त्यांना केवळ आनंद मिळतो.

खरे सावरकर कसे होते, त्यांनी किती यातना सहन केल्या आहेत, हे लोकांना कळावे. राहुल गांधी यांच्या या टिकेला वेळीस उत्तर दिले नाही, त्यावर दुर्लक्ष केलं तर पुन्हा पुन्हा टीका केली जाईल. यामुळे पुढच्या पिढीला राहुल गांधी खरा वाटायला लागेल. हा व्हिडीओ करण्यामागचा माझा हाच उद्देश असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.

इतकेच नव्हे, तर त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही टिका केली. ही भारत जोडो यात्रा म्हणजे निव्वळ दिखावा आहे. संविधान वाचवण्यासाठी काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा. मग, संविधान बचावमध्ये सावरकरांची बदनामी येते का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

भारत जोडो यात्रेला मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे महाराष्ट्रात येऊन केवळ पब्लिसिटीसाठी, स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी सावरकरांची बदनामी करण्याचे राहुल गांधीना सुचले असावे,(Sharad Ponkshe) असे पोंक्षे म्हणाले. सावरकरांचे विचार घराघरात तरुणांपर्यत पोहचावे, यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहणार. भविष्यात वीर सावरकरांवर चित्रपट बनवण्याचाही आपला विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे काय म्हणाले?

शरद पोंक्षे यांनी व्हिडिओमध्ये अप्रत्यक्षपणे राहुल गांधी आणि इतर विरोधकांना उद्देशून म्हंटले, की ‘अरे ए मुर्खा इकडे ये. कुठे भटकत असतोस? मुर्खासारखं जिकडे फिरतो आहेस, तिकडे फिरू नकोस. हिंमत असेल तर इकडे ये. सेल्युलर जेलची कोठडी आहे ही. ते आतमध्ये ये… ही बघ सात बाय अकराची कोठडी आहे. खाली जमीन बघ… बघितलीस ही जमीन? या जमिनीवरच झोपायचं. एवढीशी चड्डी, कैद्याचे कपडे, साखळदंड, गळ्यात-हातात बेड्या.. संपूर्ण अंगावर शिगा.. याच अवस्थेत झोपायचं. हा कोपरा बघ.. याच कोपऱ्यातच संडास, लघवी करायची आणि यातच राहायचं. अकरा वर्ष तात्याराव इथे राहिले. सोडलं नाही ब्रिटिशांनी. त्यांच्या गळ्यातील बिल्ल्यावर ‘डी’ लिहिलं होतं. डी म्हणजे डेंजरस. इतर कुणालाही हा बिल्ला नव्हता.’

 

थेट नाव न घेता राहुल गांधींना आव्हान देत शरद पोंक्षे म्हणाले, अकरा वर्ष, अकरा दिवस सोड. एक दिवस फक्त इथे ये. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे सगळं करून, राहून दाखवं. कोलूवर काम कर आणि काथ्याही कुट.. हे सगळं कर बाळा आणि मग बोलून दाखवं. आपल्या या व्हिडीओतून शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शब्दांकन: अमृता देशपांडे 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.