Pune News : पेट्रोल, डिझेलने सोन्या, चांदीची मस्ती उतरवली ; अभिनेता सुबोध भावेंची वाढत्या इंधन वाढीवर फेसबुक पोस्ट

एमपीसी न्यूज – भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या इंधन दराची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे. आता अभिनेते देखील देशातील इंधन दरवाढी विरोधात आपले मत मांडू लागले आहेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे यांनी फेसबुकवर मजेशीर पोस्ट शेअर करत ‘पेट्रोल, डिझेलने सोन्या, चांदीची मस्ती उतरवली’, असे लिहून इंधन दरवाढीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुबोध भावे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे, त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं. दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही ….. कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे . हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक, धन्यवाद !

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. इंडियन ऑईलच्या माहितीनुसार मुंबईत पेट्रोलचे दर 110.41 रूपये प्रति लिटर एवढे झाले आहेत, तर डिझेलचे दर 101.03 प्रति लिटर एवढे झाले आहेत. कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन वाढलेली बेरोजगारी यामुळे सामान्य नागरिकाला आर्थिक चणचण निर्माण झाली असून, वाढलेली महागाई आणि इंधन दर आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.