Vaccination News : रोज 15 लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट, राज्यात आजपासून मिशन ‘कवच कुंडल’

एमपीसी न्यूज – राज्यातील कोविड-19 लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काल रात्री राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केली. अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या.

अभियानाबाबत माहिती देताना टोपे यांनी सांगितले की, राज्यात 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान हे मिशन कवच कुंडल अभियान राबवले जाईल. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत देशभरात 100 कोटी नागरिकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून भरीव योगदान दिले जावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सुमारे 1 लाख 40 हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी एसडीआरएफ मधून सुमारे 700 कोटी रुपयांचे तरतूद केली जाणार आहे. यासाठी पोर्टलवर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती भरावी लागेल. त्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील. असे टोपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या 33 हजार 397 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.32 टक्के एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.