Alandi : एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून महिलेची फसवणूक करणाऱ्या सराईतास अटक

पिंपरी-चिंचवड सायबर सेल आणि आळंदी पोलिसांची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्या महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून महिलेच्या खात्यातून रोख रक्कम काढली. तसेच एका ज्वेलर्सच्या दुकानातून 39 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. याप्रकरणी सायबर सेल आणि आळंदी पोलिसांनी एकाला सराईताला अटक केली.

श्रवण सतीश मिनजगी (रा. भीमा कोरेगाव) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सलिमाबी कादर इनामदार (वय 60, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी इनामदार आळंदी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेल्या. एटीएम सेंटरमध्ये थांबलेल्या श्रवण याने त्यांना मदत करण्याचे भासवून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. एटीएम कार्डचा पिन नंबर विचारून एटीएम मशीन हॅक झाल्याचे सांगितले. त्यामुळे इनामदार पैसे ट्रान्सफर न करता निघून गेल्या. दरम्यान, श्रवण याने इनामदार यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून स्वतःजवळील दुसरे एटीएम कार्ड त्यांना दिले.

त्यानंतर श्रवण याने इनामदार यांच्या कार्डद्वारे 40 हजार रुपये काढले. तसेच भीमा कोरेगाव येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून 39 हजार 518 रुपयांचे सोने खरेदी केले, अशी एकूण 78 हजार 518 रुपयांची श्रवण याने इनामदार यांची फसवणूक केली. याबाबत इनामदार यांनी पोलिसात तक्रार दिली. पिंपरी-चिंचवड सायबर सेल आणि आळंदी पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करत श्रवण याला अटक केली. श्रवण याच्याविरोधात शिक्रापूर आणि अन्य पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक आर व्ही चौधर, पी व्ही जाधव, पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोडके, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, पोलीस कर्मचारी कोंकेरी, अतुल लोखंडे, भास्कर भारती, मनोज राठोड, नितेश बच्चेवार, प्रदीप गायकवाड, पोपट हुलगे, नाजुका हुलवळे, आशा सानप यांच्या पथकाने केली.

एटीएमधारकांना पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी आपले एटीएम कार्ड पैसे काढताना अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नये, तसेच एटीएम आणि बँकेची गोपनीय माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीला सांगू नये. एटीएम मशीनमध्ये पीन नंबर टाकताना कोणालाही दिसू नये, याची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.