Pune News : आत्महत्येची चिट्ठी लिहून बेपत्ता झालेल्या गौतम पाषाणकरांवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा

एमपीसी न्यूज : देणेकऱ्यांनी तगादा लावल्यामुळे आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खराडी येथील यिनयंग प्रोजेक्टमधील ग्राहकांना विकलेल्या दोन फ्लॅटवर परस्पर रित्या बँकेकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम विश्वानंद पाषाणकर आणि मंगेश अनंतराव गोळे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी महिपाल सिंह विजयसिंह ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाणकर आणि गोळे हे प्रॉक्सीमा क्रिएशन या कंपनीत भागीदार आहेत. त्यांच्या खराडी येथील यिनयंग प्रोजेक्टच्या सी विंग मधील फ्लॅट 902 हा ठाकोर यांनी 1 कोटी 56 लाख 63 हजार 987 रुपयांना खरेदी केला होता. आरोपींनी या फ्लॅटचा ताबा अद्यापही फिर्यादीना दिलाच नाही.

याशिवाय याच प्रोजेक्टमधील सी 802 हा फ्लॅट महिंद्र परसराम मनसे यांनी 81 लाख 90 हजार रुपयांना खरेदी केला होता. या फ्लॅटवर देखील व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून फिर्यादीची फसवणूक केली आहे. चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.