Alandi Crime News : अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला तब्बल 25 लाख 61 हजारांचा गुटखा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 25 लाख 61 हजार 933 रुपयांचा गुटखा पकडला. ही कारवाई शनिवारी (दि. 30) दुपारी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी फाटा येथे करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

मोहनलाल प्रल्हाद किर (वय 35, रा. चिंबळी फाटा, पुणे), मोहम्मद मझहर अस्लम (वय 28, रा. उत्तर प्रदेश), ओमजी उर्फ उमेश उर्फ ओमप्रकाश धारुराम चौधरी (वय 37, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह सुजाराम धारुराम चौधरी (वय 26, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), राजेशभाई सुपारीवाले (रा. अहमदाबाद, गुजरात), संतोष आग्रहारी (रा. म्हाळुंगे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहनलाल याच्या कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिंबळी फाटा येथील श्रीनाथ कार्गो प्रा.ली येथे सापळा लावून कारवाई केली.

पोलिसांनी आरोपी मोहनलाल याच्या ताब्यातील कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 25 लाख 61 हजार 933 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा, 46 हजारांचे चार मोबाईल फोन, 34 लाख 50 हजारांचा कंटेनर असा एकूण 60 लाख 65 हजार 933 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहा जणांवर गुन्हा दाखल करत त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.