Pune News : सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांची धरपकड सुरू, 80 जण ताब्यात

एमपीसी न्यूज : पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून झालेल्या माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. रविवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतले होते तर काही दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. 

पुण्यातील बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा निर्घुण खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करीत काही आरोपींना अटक केली आहे. याच गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत आता कोरोना नियम पायदळी तुडवली असल्याचे समोर आले आहे. या अंतयात्रेचा एक व्हिडीओ समोर आला असून मोठ्या संख्येने या तडीपार गुंडाचे समर्थक अंत्ययात्रेत जमा झाले असल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर या गुंडाच्या समर्थकांनी अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान या प्रकरणाच्या बातम्या आल्यानंतर आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस सतर्क झाले. परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने एकत्र जमल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांची ओळख पटवत त्यांची धरपकड केली आहे.

झोन दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरवरील गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात  आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करून अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणाऱ्याची धरपकड सुरू आहे. पुणे पोलिसांच्या 15 पथकाकडून आरोपींना ताब्यात घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.