Pimpri News: ब्रॅण्डेड, जेनेरिक औषधे खरेदीसाठी 6 कोटींचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी ब्रॅण्डेड औषधे, जेनेरिक औषधे आणि सर्जिकल साहित्य 3 पुरवठादारांकडून खरेदी करण्यात येतात. यासाठी दोन वर्षे कालावधीकरिता 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना कोरोना महामारीच्या संकटामुळे औषधे, साहित्य खरेदीवर तब्बल 6 कोटी वाढीव खर्च होणार असून 3 पुरवठादारांना हा खर्च देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह सर्व दवाखाने, रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे, साहित्य पुरवठा मध्यवर्ती औषध भांडार विभागामार्फत करण्यात येतो. तथापि, अपवादात्मक परिस्थितीत रुग्णांसाठी आवश्यक औषधे किंवा साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती औषध भांडारकडून होत नाही.

त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील औषध भांडारात शिल्लक नसणारी तसेच मध्यवर्ती औषध भांडाराकडील निविदेत समाविष्ट नसणारी औषधांची खरेदी वायसीएम रुग्णालयामार्फत निश्चित केलेल्या स्थानिक एजन्सीकडून निविदा प्रक्रिया राबवून खरेदी केली जातात.

त्यामध्ये बॅण्डेड औषधे, जेनेरिक औषधे, आवश्यक साहित्य खरेदी केले जाते. ब्रॅण्डेड औषधांच्या किमतीवर 15.50 टक्के सूट, जेनेरिक औषधांच्या किमतीवर 56.70 टक्के सूट आणि सर्जिकल साहित्याच्या किमतीवर 54 टक्के सूट या दराने ‘ओमनी हेल्थकेअर सिटीकेअर फार्मसी’, कोठारी मेडिकल आणि रुबी अलकेअर सर्व्हिसेस या तीन एजन्सीज निश्चित करण्यात आल्या आहेत.

रुग्णालयांकरिता तातडीने आवश्यक औषधे साहित्य खरेदीकरिता तातडीची सेवा विचारात घेता तीनही पुरवठादारांकडून औषधे खरेदी केली जातात. या निविदेचा कालावधी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 असा आहे. सुरुवातीला एक कोटी रुपये खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली.

कोरोना संकटामुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह इतर रुग्णालयांतर्गत विलीनीकरण कक्ष सुरू करण्यात आले. 1 सप्टेंबर 2020 पासून ऑटोक्लस्टर आणि अण्णासाहेब क्रीडा संकुल येथे जम्बो रुग्णालय सुरू करण्यात आले. या विभागांना आवश्यक साहित्य पुरवठा मध्यवर्ती भांडार विभागाकडून करण्यात येत होता. मात्र, या निविदा प्रक्रियेत कोरोनाकरिता आवश्यक औषधे, साहित्य यांची खरेदी समाविष्ट नव्हती.

त्यातच लॉकडाऊनमुळे मध्यवर्ती भांडारकडील पुरवठाधारकांकडून ओषधे, साहित्याच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नव्हता. त्यामुळे रुग्णसेवेत अडथळा ठरु नये याकरिता कोरोना रुग्णांवर उपचारासाठी एप्रिल 2020 पासून तातडीक औषधे, साहित्य खरेदी नेमणूक केलेल्या या तीन पुरवठाधारकांकडून उपलब्ध करुन घेतली जात आहे.

मात्र, या निविदेसाठी मंजूर असलेल्या 1 कोटी रुपयांमधून ठेकेदारांनी पुरवठा केलेल्या औषधांच्या बिलांची पूर्तता करणे शक्य होत नाही. त्यामुळे 3 कोटी 50 लाख रुपये वाढीव खर्चास स्थायी समितीने 13 जानेवारी 2021 रोजी मान्यता दिली. या वाढीव खर्चाची मर्यादाही संपुष्टात आली.

त्यातच कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा प्रचंड वाढ होऊ लागल्याने जानेवारी 2021 मध्ये बंद केलेले अण्णासाहेब क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय तसेच इतर बंद केलेली कोरोना केअर सेंटर टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार पुन्हा सुरु करण्यात आले. त्यामुळे 5 कोटी 20 लाख रुपये इतक्या वाढीव खर्चास स्थायी समिती सभेने 14 एप्रिल 2021 रोजी मान्यता दिली. ठेकेदारांनी पुरवठा केलेल्या बिलांपोटी 3 कोटी 50 लाख रुपये रकमेची पूर्तता होणे अद्यापी बाकी आहे.

निविदेची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत आहे. त्यामुळे या प्रलंबित बिलांसह पुढील सहा महिने कालावाधीसाठी वाढीव 2 कोटी 50 लाख रुपये याप्रमाणे अंदाजे 6 कोटी रुपये इतका वाढीव खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.