Chakan News : ओरिसा राज्यातून आणलेला सुमारे एक क्विंटल गांजा खेड तालुक्यात पकडला

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यातील बहुळ गावात मोठी कारवाई केली आहे. एका टोळीने ओरिसा राज्यातून आणलेला 98 किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली.

चेतन हरिराजी पुरोहित (वय 29, रा. शिरगाव, ता. मावळ, पुणे. मूळ रा. राजस्थान), कांतीलाल मांगीलाल घांची (वय 23, रा. पुनावळे, पुणे. मूळ रा. राजस्थान), मोनिका हकीम सिंह (वय 22, रा. नवी मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक केलेल्या आरोपींसह कुमकुम (रा. ओडिसा), गणेश उर्फ दीपक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार जिलानी मुसा मोमीन यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली की, एका कारमधून गांजा नेला जात आहे. ती कार खेड तालुक्यातील बहुळ गावात एका हॉटेलसमोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीन वाजता हॉटेल परिसरात सापळा लावून कारवाई केली. आर जे 14 / झेड सी 3310 या कारमध्ये आरोपी चेतन, कांतीलाल आणि मोनिका हे आढळून आले.

तिघांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल 31 लाख 73 हजार 75 रुपये किमतीचा 98 किलो 843 ग्रॅम गांजा आढळला. हा गांजा जप्त करत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गांजा आरोपी कुमकुम याच्याकडून ओरिसा राज्यातून आणला आहे. हा गांजा आणण्यासाठी आरोपींना गणेश उर्फ दीपक पवार याने मदत केली असल्याने त्या दोघांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.