Vaccination News: ज्येष्ठ, सहव्याधी असलेल्या नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्यानेच घ्यावा बुस्टर डोस

एमपीसी न्यूज – हेल्थ केअर व फ्रंट लाइन वर्करसह 60 वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा प्रिकॉशन (बुस्टर) डोस द्यायला सुरुवात झाली. शहरात 2 लाख 25 हजार 224 हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना हा बूस्टर डोस मिळणार आहे. त्यानुसार महापालिकेने नियोजन केले आहे. मात्र, 60 वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिकॉशन डोस घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

हेल्थ केअर व फ्रंट लाइन वर्करसह 60 वर्षांवरील व मधूमेह, कर्करोग, रक्तदाब अशा सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस दिला जात आहे. सध्याच्या कोविन अकाऊंटवरुन डोसससाठी नोंदणी करता येईल. कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने अथवा 39 आठवडे झालेले लाभार्थी प्रिकॉशन डोससाठी पात्र ठरतील. हेल्थ केअर व फ्रंट लाइन वर्कर, ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी आहे. त्यांची नोंदणी कोविन अॅपमध्ये नागरिक म्हणून झालेली आहे.

अशा लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोससाठी पात्र होण्याकरिता नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अशा व्यक्तींचे लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रात ऑनसाईट पद्धतीने उपलब्ध असेल. कोविन सिस्टममधून अशा व्यक्तींना प्रिकॉशन डोस घेण्यासाठी संदेश (एसएमएस) प्राप्त होणार आहे. नोंदणी व लसीकरणाची वेळ ही ऑनलाईन किंवा जागेवरच करता येईल. प्रिकॉशन डोस घेतल्यानंतर कोविन सिस्टममधून प्रमाणपत्र मिळवता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.