Chikhali : जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणांबाबत दोन्ही गटात चर्चा सुरु असताना अचानक वाद झाला. यामध्ये दोघेजण जखमी झाले तर एका महिलेचा विनयभंग झाला. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी साडेआठच्या सुमारास तळवडे येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजनीकांत बाबुराव गायकवाड (वय 26, रा. श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश वाव्हळ, दीपक वाव्हळ, विलास वाव्हळ, प्रतीक्षा वाव्हळ (सर्व रा. गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजनीकांत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी सहयोगनगर येथे आरोपी आणि फिर्यादी यांच्या नातेवाईकांची भांडणे सुरु होती. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी रजनीकांत गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी, त्यांचा मावसभाऊ विलास भालेराव व मावसबहीण पल्लवी मनेरे या तिघांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आरोपी प्रकाश वाव्हळ याने फिर्यादी रजनीकांत आणि त्यांचा मावसभाऊ विलास यांच्या डोक्यात मारून जखमी केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात 22 वर्षीय महिलेने विनयभंग व मारहाणीचा गुन्हा नोंदवला. त्यानुसार मुलचंद मनेरे (रा. ओटा स्कीम, निगडी), रजनीकांत गायकवाड, विलास भालेराव (दोघे रा. श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याबाबत चर्चा करण्यासाठी स्वाती मनेरे आणि पल्लवी मनेरे फिर्यादी यांच्या घरी आल्या होत्या. त्यांची चर्चा सुरु असताना अचानक आरोपी मुलचंद मनेरे, रजनीकांत गायकवाड आणि विलास भालेराव फिर्यादी यांच्या घरी आले. आरोपींनी फिर्यादी महिलेचे पती प्रकाश आणि दीर विलास यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्याशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.