Chinchwad : …म्हणून ‘त्या’ 30 जणांना मिळाले हरवलेले मोबाईल

केंद्र शासनाचे सीईआयआर संकेतस्थळ ठरले फायदेशीर

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाने चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी (Chinchwad)’केंद्रीय उपकरण ओळख रजिस्टर’ (सीईआयआर) हे संकेतस्थळ सुरु केले आहे.

मोबाईल चोरी झाल्यास त्याची नोंदणी या संकेतस्थळावर केल्यास चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी त्या माहितीची मदत होते. अशा प्रकारे हरवलेल्या मोबाईलची नोंदणी करणाऱ्या चिंचवड मधील 30 जणांना त्यांचे मोबाईल फोन परत मिळाले आहेत.

मोबाईल फोन चोरीला गेल्यानंतर तो सहसा (Chinchwad)परत मिळत नाही. त्यामुळे त्याला शोधण्याचा देखील अनेकदा प्रयत्न होत नाही. दरवर्षी शहरातून हजारो मोबाईल फोन चोरीला जातात. काही गहाळ होतात. त्यातील काहीच मोबाईल फोन पोलिसांना सापडतात. मात्र अनेक मोबाईल फोनचा थांगपत्ता देखील पोलिसांना लागत नाही. कारण अनेकदा प्रत्येक मोबाईल फोन सातत्याने ट्रॅक करणे पोलिसांना तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाही.

केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने www.ceir.in हे संकेस्थळ सुरु केले आहे. त्यावर तक्रारदाराला नोंदणी करता येते. मोबाईल फोन चोरीला गेल्यास अथवा गहाळ झाल्यास CEIR या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील माहिती नोंदवावी लागते. त्यानंतर चोरट्याने मोबाईल फोन सुरु केल्यास त्याची माहिती मेसेजद्वारे तक्रारदाराला मिळते.

अनेकदा चोरटे एका भागात चोरलेला मोबाईल फोन इतर शहरांमध्ये नेऊन विकतात. मात्र ते मोबाईल फोन सुरु होताच त्याची संपूर्ण माहिती तक्रारदाराला मिळते. त्यासाठी CEIR या संकेस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

चिंचवड पोलिसांनी जप्त केले 30 मोबाईल फोन

CEIR या संकेस्थळावर नोंदणी केलेल्या 30 तक्रारदारांचे मोबाईल फोन शोधण्यात चिंचवड पोलिसांना यश आले आहे. चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा सुरु झाल्याची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी संबंधित वापरकर्त्याकडून सहा लाख सात हजार रुपये किमतीचे 30 मोबाईल फोन जप्त केले. ते मोबाईल फोन पोलीस उपायुक्त (परिमंडळ एक) विवेक पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

Vadgaon : ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी अरुण वाघमारे

माहिती नोंदविण्याची प्रक्रिया

मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
चोरीला गेलेल्या मोबाईल फोनमध्ये असलेले सिमकार्ड ब्लॉक करावे.
त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड सुरु करून घ्यावे.
त्याच नंबरचे सिमकार्ड सुरु झाल्यानंतर त्याची CEIR वर नोंदणी करावी.
नोंदणी करण्यासाठी प्रथम www.ceir.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
ब्लॉक स्टोलन अथवा लॉस्ट मोबाईल यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून सबमिट करावे.
पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रत, मोबाईल फोनचे खरेदी बिल आणि तक्रारदाराचे कोणतेही शासकीय ओळखपत्र ही कागदपत्रे जोडावी लागतील.
CEIR वर नोंदणी केल्यानंतर तक्रारदारास रिक्वेस्ट नंबर मिळेल.
हरवलेला मोबाईल एक्टीव्ह अथवा ऑन झाल्यास त्याची माहिती रजिस्टर मोबाईलवर एसएमएसद्वारे तक्रारदारास मिळेल.
एसएमएस द्वारे माहिती मिळताच त्याची पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. पोलीस संबंधित ठिकाणी जाऊन मोबाईल जप्तीची व पुढील कारवाई करतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.