Chinchwad : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली –  डॉ. नीलम गो-हे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पाखाखालची वाळू आता पूर्णपणे सरकली आहे. ’उडाले ते कावळे अन् राहिले ते मावळे’, हे बाळासाहेबांचं वाक्य आता त्यांच्या तोंडी यायला लागले आहे. इतकेच नव्हे, तर आमचा भगवा रंग सुद्धा म्हणे, त्यांच्या झेंड्यावर दिसणार आहे. आमची वाक्ये घ्या, झेंड्याचा रंग घ्या, काहीही घ्या, पण आमचं मन आणि मत काही तुम्हाला मिळणार नाही, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गो-हे यांनी लगावला. शिवसेनेमुळे हे विधानपरिषदेचे उपसभापतीपद मला मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक उपसभापती आहे, अशी कृतज्ञ भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना भोसरी विधानसभेतर्फे आज (शुक्रवारी) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.  हॉटेल न्यू बर्ड व्हॅलीच्या सभागृहात पार पडलेल्या या शिबीराला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला आघाडी संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेते राहुल कलाटे, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेविका मीनल यादव, अमित गावडे, जितेंद्र ननावरे, निलेश मुटके आदी उपस्थित होते.

रवींद्र मिर्लेकर म्हणाले, सर्वसामान्यांसाठी, कष्टक-यांसाठी चळवळीतून शिवसेना उभारली आहे. त्याच शिवसेनेचे कार्य केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील नागरीकांना जिव्हाळ्याचे, आपुलकीचे वाटू लागले आहे. कारण, आपण ज्या शहरात, गावात राहतो, त्याचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने, शिवसैनिक कार्य करत असतो. शिवसैनिकांनीही जनतेचा आधारवड झाले पाहिजे.

बाळा कदम म्हणाले, संघर्ष शिवसैनिकाच्या रक्तातच आहे आणि त्याच्यावरच ही लढवय्यी शिवसेना उभी आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीने आणि गटबाजी विसरून उतरूया, असे आवाहन केले. उमेदवारी कुणालाही द्या. पण, चिन्ह धनुष्यबाण आणि उमेदवार शिवसेनेचाच असावा, अशी अपेक्षा सुलभा उबाळे आणि इरफान सय्यद यांनी व्यक्त केली. धनंजय आल्हाट यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.