Pimpri News : नोंदणी केली तरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मिळणार या तीन केंद्रांवर लस

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे देखील लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात 1 मे पासून या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज (रविवारी, दि. 2) शहरातील तीन लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस मिळणार आहे. त्यामुळे नोंदणी न केलेल्या नागरिकांनी केंद्रांवर विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना या तीन केंद्राच्या ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या वयोगटातील नोंदणी केलेल्या 600 नागरिकांपैकी 552 नागरिकांचे शनिवारी (दि. 1) लसीकरण करण्यात आले आहे.

आज (रविवारी) 600 नागरिकांचे लसीकरण नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना या तीन केंद्रांवर केले जाणार आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी http://www.cowin.gov.in/  या संकेतस्थळावर नोंदणी करून Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत वरील तीन केंद्रांवर जाऊन नियोजित वेळेत लस घ्यावी.

रविवारी लस साठा शिल्लक नसल्यामुळे 45 वर्ष वयाच्या पुढील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.