Pimpri : अण्णाभाऊ साठे जयंतीमधील सावळा गोंधळ आवरा – दत्ता साने 

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये उत्सवात भाजपच्या पदाधिका-याने नाव व फोटो वापरुन महापालिकेचा लोगो विनापरवाना वापरला असल्याचा आरोप करत संबंधित स्मृतिचिन्ह करणा-या संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिकेकडे केली आहे. 

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात प्रशासन, अधिका-यांमध्ये कसलाही समन्वय नाही. त्यामुळे जयंती उत्सवात सावळा गोंधळ सुरु आहे. महापालिकेतर्फे कलाकारांचा सत्कार करण्यासाठी पुस्तके दिली जातात. या कार्यक्रमात फकिरा कांदबरी देण्याऐवजी मदर तेरेसा यांचे पुस्तक देऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात कार्यक्रमाच्या ठिकाणी येणा-या पाहुणे, कलाकार यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालयाची सुविधा नाही. नियोजित कार्यक्रमांची पूर्वसूचना वक्त्यांना व कार्यकर्त्यांना देण्यात येत नाही. तसेच या कार्यक्रमात कला सादर करणा-या कलाकाराचे मानधनही अपुरे दिलेले आहे. कलाकारांना ठरल्याप्रमाणे मानधन दिले जात नाही. अशा स्वरुपाच्या लेखी तक्रारी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे प्रमुख पदाधिका-यांनी केल्या आहेत.

त्यामुळे आपण वैयक्तिक लक्ष देऊन पुढील कार्यक्रम नियोजनपूर्वक पार पडतील याची दक्षता घ्यावी. तसेच या कार्यक्रमाचे ढिसाळ संयोजन केल्याबाबत संबंधित अधिका-यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साने यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.