CM Uddhav Thackeray : राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत आणि या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. दरम्यान, वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून येणाऱ्या हा आक्रोशाला नेमकं कोण जबाबदार यावर सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्याची बाजू मांडून राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही असे स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.27) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कोरोना सद्यस्थितीसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये महागाईने होरपळणाऱ्या जनतेचा प्रश्न आवर्जून मांडला गेला. यावेळी बोलताना इंधनावरील दर कमी करावा, जनतेला यातून दिलासा द्यावा असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चांगलीच कानउघडणी केली.

यावर उत्तर देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ट्वीट करत राज्याची बाजू मांडून यावर चांगलाच टोला लगावला आहे. ट्वीटमध्ये मुख्यमंत्री ठाकरे लिहितात, मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये 24 रुपये 38 पैसे केंद्राचा तर 22 रुपये 37 पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात 31 रुपये 58 पैसे केंद्रीय कर तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही, असे म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी इंधन दरवाढीमागच्या वस्तूस्थितीची जाणीव करून दिली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस खिसा रिकामा करणाऱ्या इंधन दरवाढीला नेमकं कोण जबाबदार, भविष्यात ही दरवाढ कमी होणार का, की केवळ राजकारणापुरताच हा विषय मर्यादित राहणार हे या निमित्ताने पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.