Pune News : पुण्यातील गुंड सुलतान उर्फ टिप्या शेख टोळीवर पोलिस आयुक्तांकडून मोक्काअंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला परिसरात दहशत माजविणारा गुंड सुलतान उर्फ टिप्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दहा जणांच्या टोळीतील नऊ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी टिप्या मात्र अजूनही फरार आहे. तडीपार असतानाही या टोळीने एका चौदा वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला होता. 

रामनाथ उर्फ पापा मेनिनाथ सोनवणे, सागर उर्फ सॉगी किशोर गायकवाड, विनोद उर्फ विन्या सुनील वाघमारे, साहिल उर्फ सोन्या राजू वाघमारे, श्याम किशोर काळे, अनिकेत किशोर कंदारे, सौरभ तिमाप्पा धनगर आणि अतुल श्रीपास म्हस्कर उर्फ सोनू परमार, शुभम अनिल धिवार अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या सुलतान उर्फ टिप्या लतीफ शेख (रा. ताडीवाला रोड) हा मात्र अजूनही फरार आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, टिप्या आणि त्याच्या टोळीने ताडीवाला रस्ता परिसरात दहशत निर्माण केली होती. या टोळीने काही दिवसांपूर्वीच एका चौदा वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला केला होता. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातून तडीपार असतानाही टिप्या याने तडीपारी आदेशाचा भंग करत हा गुन्हा केला होता.

दरम्यान टिप्या हा गुन्हेगारी कारवया साठी तरुणांची टोळी निर्माण करुन त्यामार्फत समाजविघातक कृत्ये करत होता. त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहता पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करून तो परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांचेकडे पाठवला होता. त्याची छाननी करण्यात आली. तसेच हा प्रस्ताव डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीवर मोक्काची कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.