Pune News : बायजु व किंग खानला पुणे ग्राहक न्यायालयाचा दणका, नुकसान भरपाई देण्याचा आदेश

एमपीसी न्यूज – खासगी शिक्षण सेवा पुरवणाऱ्या बायजु आणि त्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेता शाहरुख खान यांना पुणे ग्राहक न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. पैसे घेऊन देखील शैक्षणिक सेवा न दिल्याबद्द्ल तसेच, पालकांच्या परवानगी शिवाय कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायलयाने रविंद्रन बायजु, रिजु रविंद्रन, दिव्या गोकुळनाथ आणि अभिनेता शाहरुख खान यांना फटकारले आहे. व नुकसान भरपाई देण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे.

चिंचवड मधील एका पालकाने आपल्या पाल्याच्या चौथी ते बारवी पर्यंतच्या शिक्षणासाठी बायजु मोबाईल ॲप्लिकेशन वरती नावनोंदणी केली व त्यासाठी 15 हजार रुपये रक्कम ऑनलाईन जमा केली. उरलेली 1 लाख 10 हजार रुपये रक्कम हप्त्यांत भरण्यास सांगितले. कंपनीने कोर्स न पसंत पडल्यास पैसे परत करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार पालकांनी भरलेले पैसे परत करण्याची विनंती केल्यावर कंपनीने नकार दिला एवढंच नव्हे तर, त्यांच्या परवानगी शिवाय 1 लाख 10 हजार रुपयांचे कर्ज देखील घेतले.

वारंवार मागणी करूनही बायजु कंपनीने पैसे परत केले नाहीत तसेच, शिक्षणासाठी दिलेला लॅपटॉप देखील जमा करून घेतला. त्यानंतर तक्रारदार पालकांनी मार्च 2019 मध्ये ग्राहक न्यायालयात धाव घेतली व कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. न्यायलयाने सर्वांना नोटीस बजावली, मात्र त्यांच्या कडून कोणीही न्यायलयात हजर झाले नाही.

ग्राहक न्यायालयाने कंपनीला तक्रारदार यांचे 15 हजार रुपये परत करण्यास सांगितले तसेच, पैसे भरल्यापासून ते 14 ऑक्टोबर 2018 पर्यंत रक्कमेवर 9 टक्के व्याज देखील देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, 50 हजार रुपये नुकसानभरपाई देखील देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय घेतलेल्या कर्जाचा ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे, जेणेकरून तक्रारदार यांना कर्जाचे हप्ते भरावे लागणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.