Pimpri News : वायसीएमएचसह पालिकेच्या रुग्णालयातील आस्थापनेवरील वैद्यकीय कर्मचा-यांना कोविड भत्ता 

स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिका इतर रुग्णालये, दवाखाने या ठिकाणी कोरोनाच्या काळात आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग 1 ते 4 मधील 1 हजार 156 कर्मचा-यांना तीन महिन्यांचा कोविड भत्ता देण्यासाठी 1 कोटी 4 लाख 35 हजार रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या आयुक्तांनी आयत्यावेळी मांडलेल्या प्रस्तावाला काल (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

महापालिका हद्दीत दुसरी लाट मोठी तीव्र आली होती. त्याचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय कर्मचा-यांनी जिवाचे रान केले. जीव धोक्यात घालून काम केले. कोरोना काळात काम करणा-या वायसीएम रुग्णालयासह महापालिका रुग्णालय, दवाखान्यातील अधिकारी, कर्मचा-यांना स्वतंत्र कोविड भत्ता अदा करण्याबाबत वैद्यकीय मुख्य कार्यालयामार्फत 19 मे रोजी आयुक्तांकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार कोविड काळात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक, स्टाफनर्स, सर्व पॅरामेडीकल स्टाफ, प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग 4 मधील कर्मचा-यांना वेतनाव्यतिरिक्त स्वतंत्र कोविड भत्ता देण्यास स्थायी समितीने 1 एप्रिल रोजी मान्यता दिली होती.

त्याचधर्तीवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेची इतर रुग्णालये आणि दवाखाने या ठिकाणी कोरोनाच्या काळात आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग 1 व 2 च्या कर्मचा-यांना 15 हजार रुपये, वर्ग 3 मधील कर्मचा-यांना 10 हजार आणि वर्ग 4 मधील कर्मचा-यांना 5 हजार रुपये भत्ता मिळणार आहे.

1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या तीन महिन्याच्या कालावधीसाठी हा भत्ता देण्यात येणार आहे. वर्ग 1 चे 84, वर्ग 2 चे 88, वर्ग 3 चे 587 आणि वर्ग 4 चे 397 अशा 1 हजार 156 कर्मचा-यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 4 लाख 35 हजार रुपये खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.