Dehuroad : चोरलेल्या दुचाकी मनी ट्रान्सफर सेंटरमध्ये ठेऊन पैसे घेऊन व्हायचे पसार; चोरट्यांची आयडिया पोलिसांनी उधळली
देहूरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – चोरीची वाहने भंगारात अथवा (Dehuroad) इतर नागरिकांना न विकता ती मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेऊन तिथून पैसे घेऊन चोरटे पसार होत. वाहन चोरट्यांचा हा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी हाणून पाडला आहे. बीड येथील दोन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवड, अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांमधून चोरलेल्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत.
अमृत भाऊसाहेब देशमुख (वय 46, रा. कान्नापूर, सिरसाळा, ता. धारूर, जि. बीड), फारूक शब्बीर शेख (वय 37, रा. मोहा रोड, सिरसाळा, ता. धारूर, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना देहूरोड पोलिसांना सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे आढळले. चोरट्यांची ओळख निष्पन्न करून पोलिसांनी त्यांना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्या चोरट्यांनी देहूरोड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, छत्रपती संभाजी नगर, घोडेगाव अहमदनगर येथून चोरी केलेल्या आठ लाखांच्या 11 दुचाकी जप्त केल्या.
चोरट्यांनी सहा दुचाकी आळंदी मरकळ रोड, लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरुळी परिसरातील वेगवेगळ्या मनी ट्रान्सफर सेंटर समोर पार्क केलेल्या होत्या. शहरातून दुचाकी चोरायच्या. त्या दुचाकी एखाद्या मनी ट्रान्सफर सेंटर समोर लावायच्या. त्यानंतर मनी ट्रान्सफर सेंटर मधून सुरुवातीला 20 ते 25 हजार रुपये रक्कम आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घ्यायची. त्यानंतर रोख रक्कम देण्यासाठी नसल्याचे सांगायचे.
Dapodi : एक हजार रुपये न दिल्याने एकास बेदम मारहाण
एटीएम मधून पैसे काढून घेऊन येतो, माझी दुचाकी इथेच आहे, असा (Dehuroad) बहाणा करून चोरटे तिथून धूम ठोकत आणि थेट गाव गाठत. अशा प्रकारे त्यांनी सहा दुचाकी मनी ट्रान्सफर सेंटर मध्ये लावल्या होत्या. इतर पाच दुचाकी त्यांनी आळंदी येथे लपवून ठेवल्या होत्या.
या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील तीन, आळंदी तीन, सांगवी, हिंजवडी, क्रांती चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर शहर, सोनई पोलीस स्टेशन अहमदनगर येथील प्रत्येकी एक असे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित एका दुचाकीच्या मालकाचा देहूरोड पोलीस शोध घेत आहेत.