ST News : ते पत्र आमचे नव्हेच; एसटी महामंडळाचा खुलासा

एसटी महामंडळाच्या नावाने व्हायरल झालेल्या पत्राबाबत महामंडळाचा खुलासा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नावाने सोमवारी (दि. 7) एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र अशा प्रकारचे कोणतेही पत्र एसटी महामंडळाने दिलेले नाही तसेच अशा प्रकारचा निर्णय देखील विचाराधीन नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

एसटी कर्मचा-यांनी त्यांच्या मागण्यांसाठी मागील काही महिन्यांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीचे चाक जागेवर थांबले असून याचा फटका महामंडळाला चांगलाच बसत आहे. दरम्यान काही कामगार कर्तव्यावर पुन्हा रुजू होत आहेत. या पार्श्वभूमीवर अज्ञातांनी खोडसाळपणे एक पत्र व्हायरल केले.

संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या कर्तव्यावर रुजू झालेल्या, होत असलेल्या एसटी कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र एसटी महामंडळाचे व्यवस्थापक (कर्मचारी वर्ग) यांच्या स्वाक्षरीने व्हायरल केले होते.

यावर एसटी महामंडळाने खुलासा दिला आहे. सदर परिपत्रक पूर्णतः खोटे व बनावट आहे. कर्मचा-यांमध्ये हेतुपुरस्सर संभ्रम निर्माण करून त्यांना आपल्या कर्तव्यावरून परावृत्त करण्याच्या गैर उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती अथवा समूहाने ते पत्र प्रदर्शित केले आहे. संबंधित अज्ञात व्यक्ती अथवा समूहावर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची तक्रार एसटी महामंडळाने पोलिसांकडे केली आहे.

तसेच 10 मार्च 2022 पर्यंत हजर होणा-या एसटी कर्मचा-यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा एसटी महामंडळाचा मानस नाही, असे एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे.

व्हायरल पत्र –

एसटी महामंडळाचा खुलासा – 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.