Rakshak Matrubumiche : सेना दलात प्रवेश म्हणजे ‘सुरक्षित’ भविष्याची खात्री आणि देशसेवेची संधी – ब्रिगेडियर हेमंत महाजन

'एमपीसी न्यूज'च्या 'रक्षक मातृभूमी'चे कार्यक्रमासाठी आबालवृद्धांची हजेरी

एमपीसी न्यूज – सेना दलात प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्या ‘सुरक्षित’ भविष्याची खात्री मिळते. इतर नोकरीपेक्षा सैन्यदलात (Rakshak Matrubumiche) मिळणारे लाभ हे अधिक चांगले आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे देशसेवेची चांगली संधी मिळते. परंतु ‘सेना दलात भरती होणं म्हणजे जोखीम’ अशा अर्थाने याकडे पाहिले जात असल्याने अनेकांना सेना दलातून देशसेवा करता येत नाही. जोखीम ही प्रत्येक क्षेत्रात आहे. अगदी रस्त्याने जाताना देखील मृत्यूची भीती आहे. अशा प्रकारे मरण्यापेक्षा देशाच्या सीमेवर, देशाचे रक्षण करताना आलेला मृत्यू हा अभिमानाचा असतो, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘रक्षक मातृभूमीचे’ हा ‘सशस्त्र सेनादलातील करियरच्या संधी’ या विषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम एमपीसी न्यूज आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या वतीने घेण्यात आला. मंगळवारी (दि. 10) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन (Rakshak Matrubumiche) बोलत होते.

निवृत्त मेजर जनरल जया प्रसाद नायर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यक्रमाचे प्रायोजक ऑर्बिटल ग्रुपचे संचालक प्रकाश बिचे, एस.ए. आर इंडस्ट्रीजचे संचालक अतुल इनामदार तसेच माजी नगरसेवक अमित गावडे, एमपीसी न्यूजचे मुख्य संपादक विवेक इनामदार, एमपीसी न्यूज शिक्षण संवादचे मानद संपादक डॉ. अ. ल. देशमुख, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर, सहयोगी संपादक अनिल कातळे, फीचर्स आणि आर अँड  डी विभागाचे संपादक राजन वडके आदी मंचावर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली होती.

कीर्तीचक्र पुरस्कार विजेते सुभेदार संतोष तानाजी राळे, पॅरा कमांडो रघुनाथ सावंत यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. त्याचबरोबर वीरपत्नी यशोदा केशव गोसावी, कमल वसंत लहाने, धरित्री सुरेश घुगे, आशा रावसाहेब सोनजे, सविता प्रशांत गुंजाळ, मीनाक्षी शिरीषकुमार भिसे यांचा देखील सन्मान करण्यात आला. वीरकन्या हिमाचली शिरीषकुमार भिसे हिने यावेळी मनोगत व्यक्त केले. सलग 65 मिनिटे तलवारबाजी करून इंडिया बुकमध्ये नोंद झालेल्या शिवकन्यांचा त्यांच्या प्रशिक्षकांसह (Rakshak Matrubumiche) कार्यक्रमात सत्कार झाला.

Rakshak Matrubumiche

हेमंत महाजन पुढे म्हणाले, “सेना दलात काम करताना प्रत्येक जवानासाठी देश हा सर्वप्रथम असतो आणि आपण स्वतः सर्वात शेवटी असतो. स्वतःचा, कुटुंबाचा असा संकुचित विचार न करता संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा विचार करून प्रत्येक जवान देशाच्या प्रत्येक भागात कार्यरत असतो. सैन्य दलात जाण्यासाठी अगम्य इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर चांगली तयारी केली तर सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची संधी सहज मिळते.

ब्रिगेडियर महाजन यांनी आर्मी, सेंट्रल आर्म्ड फोर्सेस, एनडीए ऑफिसर, सीडीएसई, ओटीए, टीईएस, टीजी, सीएपीएफ, सीएपीएफ एएसआय यासह सशस्त्र सेना दलातील सर्व प्रकारच्या विभागातील भरती प्रक्रिया, किती पदांची भरती होणार, कधी होणार, त्याची माहिती कुठे मिळेल याबाबत माहिती दिली. एनडीए खडकवासलामध्ये यावर्षी 19 मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. याद्वारे मुलींना देखील एनडीएमध्ये भरती होता येईल, असेही ब्रिगेडियर महाजन म्हणाले.

Rakshak Matrubumiche MPC News

ब्रिगेडियर महाजन यांनी सन 1947, 1965, 1971, 1999 साली पाकिस्तानसोबत झालेल्या, सन 1962 साली चीनसोबत झालेल्या युद्धांचा उल्लेख करत हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम, सियाचीन तसेच देशात वेळोवेळी सेना दलांनी केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली. बीएसएफ, पॅरा मिलिटरी फोर्सेस, नेव्ही, कोस्टगार्ड अशा सैन्य दलातील जवानांना आणि अधिका-यांना देशाच्या कोणत्या भागात कसे काम करावे लागते याबाबत महाजन यांनी सचित्र माहिती दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने भारतासमोरील आव्हानांचा उहापोह करून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘ज्यांना काहीतरी वेगळं आणि चांगलं करायला आवडतं त्यांनी सैन्य दलात प्रवेश करायला हवा’ असे आवाहन देखील केले. सातारा, कोल्हापूर, बुलढाणा येथे भरतीपूर्व सरकारी प्रशिक्षण संस्था आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिक शाळा आहेत. औरंगाबाद येथे एक सरकारी संस्था असून तिथे एनडीए भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. सैन्य दलात जाण्यासाठी बौद्धिकसह शारीरिक सराव देखील महत्त्वाचा आहे. लेखी परीक्षेत पास झालेले 30 टक्के उमेदवार वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडतात. त्यामुळे ज्यांना सैन्य दलात भरती होण्याची इच्छा आहे, त्यांनी तयारी करण्यापूर्वी आपली संपूर्ण वैद्यकीय चाचणी करणे देखील आवश्यक असल्याचे महाजन यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी कायम दोन ते तीन करिअर समोर ठेऊन तयारी करावी. दहावीच्या उन्हाळी सुट्टीपासून एनडीएची तयारी सुरु करावी. परीक्षेच्या तयारीसाठी वेळ द्यायला हवा. त्यासाठी प्रथम परीक्षांचा अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे, याबाबत देखील ब्रिगेडियर महाजन यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.

एमपीसी न्यूज शिक्षण संवादचे मानस संपादक डॉ. अ ल देशमुख यांनी प्रास्ताविकात एमपीसी न्यूजने सुरु केलेल्या शिक्षण संवाद आणि इतर उपक्रमांविषयी माहिती दिली. समाजाच्या सर्व घटकांच्या उपयोगाची माहिती एमपीसी न्यूज सुरुवातीपासून देत आहे. पाल्यांच्या शिक्षणाबाबतचे अनेक संभ्रम पालकांच्या मनात असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे. शिक्षण संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून एमपीसी न्यूजने पालकांची आणि विद्यार्थ्यांची ती गरज भागविण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन यातून मिळेल असा विश्वास डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, “महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित विषयावर एमपीसी न्यूजने लक्ष केंद्रित केले आहे. मी देखील एनसीसीत होतो. विद्यार्थीदशेत असताना अभिमानाने एनसीसीत काम केले. वयाच्या 21 व्या वर्षी पोलीस दलात दाखल झालो. त्यानंतर प्रशासकीय सेवेत आलो. एनडीए आणि इतर शाखांबाबत अजूनही ग्रामीण भागातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती नाही. एमपीसी न्यूजच्या उपक्रमामुळे ही माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही ढाकणे म्हणाले.

Symbiosis University : सिंबायोसिस विद्यापीठाची दर्जेदार शिक्षणासाठी ओळख-आरोग्य मंत्री राजेश टोपे

निवृत्त मेजर जनरल जया प्रसाद नायर यांनी अध्यक्षीय भाषणात सेना दलांमध्ये भरती झाल्यानंतर येणारे अनुभव, व्यक्तिमत्व विकास याबाबत माहिती दिली. देशातील प्रत्येक भागात जाऊन तिथल्या लोकांना समजण्याचा अनुभव येतो. देशभक्तीची भावना वाढीस लागते. जीवनाला शिस्त देखील सैन्य दलामुळे लागते, असेही नायर यांनी सांगितले.

‘अमर जवान’च्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

याखेरीज फाईन इक्व्युपमेंट इंडिया प्रा. लि. व पेटकर इंजिनिअर्स यांचेही कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रताप भोसले, शुभांगी सरोते, अमोल गाडगीळ,  गणेश यादव, श्रीपाद शिंदे, अनुप घुंगुर्डे, प्रवीण टाव्हरे, आकांक्षा इनामदार, भीम मागाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.