Pimpri news: गृहनिर्माण संस्थेमधील क्लब हाऊसमध्ये ‘आयसोलेशन सेंटर’ उभारावे; आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत गृह विलगीकरण कक्षामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्य, शेजारच्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यासाठी अशा रुग्णांना स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे आवश्यक आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी गृहनिर्माण संस्थेमधील क्लब हाऊसमध्ये विलगीकरण कक्ष (आयसोलेशन सेंटर) उभारून रुग्णाला तेथे ठेवण्यात यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

याबाबत गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र पाठविले आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसाला तीन हजार नवीन रुग्णांची भर पडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत गृह विलगीकरण कक्षामध्ये कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत.

त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  गृहनिर्माण संस्थेमधील इमारतीतील ज्या रुग्णांना गृह विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. अशा रुग्णांना क्लब हाऊसमध्ये कोरोना विलगीकरण कक्ष निर्माण करून तेथे ठेवण्यात यावे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल.

या रुग्णासाठी लागणारे बेड, स्वच्छतागृह, पाणी, दैनंदिन स्वच्छता व घरून जेवण आणण्याची व्यवस्था करण्यात यावी. विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या उपचारासाठी महापालिका, खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी. तातडीने गृहनिर्माण संस्थेमधील क्लब हाऊसमध्ये कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात यावे. त्याची माहिती जवळच्या महापालिका रुग्णालयास देण्यात यावी.

तसेच जेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णांवर उपचाराकरिता वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. या पथकामार्फत दिवसातून दोनवेळा रुग्णांची तपासणी व उपचार करण्याची दक्षता घ्यावी, असे आयुक्तांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

कोविड आयसोलेशन सेंटरबाबत याआहेत मार्गदर्शक सूचना!
# आरक्षित निवासी संकुलाच्या सल्लागार समितीने नेमून दिलेल्या मूलभूत प्रतिबंध आणि नियंत्रण पद्धतीचे अनुसरण आरडब्ल्यूए, निवासी संस्था करतील.
#कोरोनाच्या संशयीत, लक्षणे नसलेल्या, पूर्व लक्षणात्मक, अत्यंत सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णाच्या व्यवस्थपनासाठी  ही आरोग्य सुविधा समर्पित असेल.
# वृद्ध रुग्ण, 10 वर्षाखालील मुले, गर्भवती, स्तनपान देणारी महिला, अतिजोखमीचे रुग्ण (मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, मूत्रपिंडाचा रोग, कर्करोग इतर कारणामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या) रुग्णांना ही सुविधा लागू राहणार नाही. या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल.
# कोरोना संशयीत आणि पॉझिटिव्ह रुग्णांना एकत्र ठेवण्यास परवानगी नाही
# विलगीकरण कक्षात डॉक्टर, काळजीवाहू व्यक्ती आणि रुग्णवाहिका सेवा यासारखे महत्वाचे दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे दर्शविले जातील याची दक्षता घ्यावी
# स्वतंत्र प्रवेश व निर्गमन असणे बंधनकारक, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिग असणे आवश्यक
# बेडमध्ये कमीत कमी एक मीटरचे असावे
# रुग्णांना सतत ट्रिपल लेअर मास्क वापरावा लागेल
#काळजीवाहू व्यक्ती या सुविधेत दाखल झालेल्या रुग्णांची नोंद ठेवेल
# रुग्ण घर, पार्क किंवा इतर सार्वजनिक सुविधांना भेट देऊ नयेत. यासाठी व्हिडीओ कॅमेरा मॉनिटरिंगद्वारे किंवा संरक्षकांद्वारे निरीक्षणाची यंत्रणा असेल
#जेवणाची सोय डीस्पोजेबल प्लेटमध्ये करावी
# श्वास घेण्यास अडचण, ऑक्सिजन पातळी कमी होणे, छातीत सतत वेदना, मानसिक गोंधळ किंवा बेशुद्धता, बोलण्यात असस्पष्टता, अशक्तपणा, चेहरा निळसर पडणे ही गंभीर लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी
# जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट संबंधित रुग्णालयामार्फत करण्यात यावी

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.