Pune News : राज्य अजिंक्यद हॉकी विजेतेपदासाठी पुणे-कोल्हापूर संघांमध्ये लढत

एमपीसी न्यूज : राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी 2019 च्या स्पर्धेचा अॅक्शन रिप्ले बघायला मिळणार आहे. गतविजेते पुणे आणि उपविजेते कोल्हापूर यांच्यातच पुन्हा एकदा विजेतेपदाची लढत रंगणार आहे. 

 

पिंपरी नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे संघाने उस्मानाबादचा एकतर्फी खेळात 6-1 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूरने औरंगाबादचे आव्हान 3-0असे संपुष्टात आणले.

रुगफान शेख आणि तालिब शाह यांनी पुणे संघासाठी प्रत्येकी दो गोल केले. गुरफानने 12 आणि 50 व्या, तर तालिबने सामन्याच्या चौथ्या सात्रत गोल केले. पुण्यासाठी अन्य दोन गोल अथर्व कांबळेने 15 आणि अब्दुल कादिर सलमणी याने 52 व्या मिनिटाला केले. उस्मानाबादचा एकमात्र गोल वस्ताद फिरोज याने 55 व्या मिनिटाला केला.

त्यापूर्वी झालेल्या सामन्यात कोल्हापूरने आठव्याच मिनिटाला आपले खाते उघडले. आशिष चोपडे याने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर औरंगाबादने बरोबरी साधण्यासाठी अथक प्रयत्न केले, त्यामुळे सामन्यातील रंगत वाढली होती. विश्रांतीला कोल्हापूरला आपली आघाडी वाढवता आली नाही. उत्तरार्धात चौथ्या सत्रात मात्र औरंगाबादच्या बचावफळीला चतुराईने चकवत मयुरा पाटीलने दोन गोल केले. पहिला गोल त्याने 56 व्या मिनिटाला केला. त्यानंतर 59 व्या मिनिटाला त्याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.

निकाल –

हॉकी कोल्हापूर 3 (आशिष चोपडे 8 वे, मयुर पाटील 56, 59 वे मिनिट) वि.वि. हॉकी असोशिएशन ऑफ औरंगाबाद 0 (मध्यंतर 1-0)

हॉकी पुणे 6 (गुरफान शेख 12, 50वे, अथर्व कांबले 15वे, अब्दुल कादिर सलमानी 52वे, तालिब शाह 54, 57 वे मिनिट) वि.वि. हॉकी उस्मनाबाद १ (वस्ताद फिरोज 55 वे मिनिट) मध्यंतर 2-0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.