Dapodi News : हॅरीस ब्रिजवरून नदीत पडलेल्या तरुणाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण

एमपीसी न्यूज – दापोडी पुल (हॅरीस ब्रिज )येथे नदीपात्रात पडलेल्या तरूणाला वाचवण्यात पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. जवानांनी  बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात उतरून तरुणाला सुरक्षितपणे नदीपात्राच्या बाहेर काढले.

दापोडी पुल येथे नदीपात्रात एक 32 वर्षीय तरुण पडला असल्याची माहिती नागरिकांनी पिंपरी येथील अग्निशमन दलाला दिली. घटनेचे गांभीर्य बघता अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी जवानांना एक तरुण नदीपात्राच्या मधोमध गुडघाभर पाण्यात अडकल्याचे निर्दशनास आले.

मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात उतरून तरुणाला सुरक्षितपणे नदीपात्राच्या बाहेर काढले. अंधार असल्या कारणाने बचाव कार्यात अडथळा येत असतांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनीअतिशय कुशलपणे तरुणाला वाचवले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांना माहिती देत तरुणाला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात रवाना केले.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे फायरमन  सारंग मंगरूळकर, भूषण येवले, वाहनचालक रुपेश जाधव, वाहनचालक  रोकडे, ट्रेनी फायरमन सिद्धेश दरवेश, विकास दाभाडे, सुक्रे, ट्रेनी सब ऑफिसर अभिजित पाटील, सिद्धेश बोडके,  चव्हाण आदींनी या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.