Pimpri News : आंबेडकरी चळवळीत अन्यायाविरुद्ध लढण्याचे स्फुरण मिळते – वैशाली शिंदे

एमपीसी न्यूज – आंबेडकरी चळवळी खूप स्वाभिमानी आहे. हा स्वाभिमान माझ्यामध्ये रुजला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझे अस्तित्व आणि ओळख आहे. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने ही चळवळ नेटाने पुढे नेण्यासाठी  आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील, असे उद्गार आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ  गायिका वैशाली शिंदे यांनी काढले. आंबेडकरी चळवळीत अन्यायाविरुद्ध लढण्याचे स्फुरण मिळते. मला ही स्फूर्ती  मिळाल्यानेच मी गायनाच्या माध्यमातून परखड भूमिका घेऊ शकले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकरी चळवळीत गायन कलेच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल दरवर्षी याक्षेत्रातील कलाकाराचा सन्मान महापालिकेच्या वतीने करण्यात येत असतो. विचार प्रबोधन पर्वातील कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हा पुरस्कार वैशाली शिंदे यांना संयोजक तथा मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम आणि जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्राचे वाचन पौर्णिमा हिंगे यांनी केले.

जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग येत असतात. पण, या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ महापुरुषांच्या विचाराने येत असते, असे नमूद करून वैशाली शिंदे म्हणाल्या, आंबेडकरी चळवळीत अन्यायाविरुद्ध लढण्याचे स्फुरण मिळते. मला ही स्फूर्ती  मिळाल्यानेच मी गायनाच्या माध्यमातून परखड भूमिका घेऊ शकले. माझी दखल घेऊन महापालिका माझा सन्मान करत आहे ही काळजात कोरून ठेवावी अशी घटना आहे. हा मानसन्मान मला बाबासाहेबांमुळेच मिळाला असे त्यांनी गहिवरल्या शब्दात सांगितले.

दरम्यान, विचार प्रबोधन पर्वामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तृतीयपंथीय समाजाच्या प्रतिनिधींनी  बाबासाहेबांना केलेले वंदन, एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने हेलीकॉपटरद्वारे पिंपरी येथील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर  केलेली पुष्पवृष्टी, आदिवासी तारपा नृत्यातून महामानवांना केलेले अभिवादन, समता सैनिक दलाची बाबासाहेबांना दिलेली सलामी अशी विविध वैशिष्ट्ये या कार्यक्रमांची होती.

तसेच शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्ठान औरंगाबाद प्रस्तुत  “निळी पहाट” हा बुद्धभीम गीतांची परिवर्तनवादी मैफिल,रुपेश निकाळजे यांचा “क्रांतीचा साक्षीदार”, प्रतापसिंग बोदडे,अॅड. रागिणी बोदडे, कुणाल बोदडे यांचा  “पारिवारिक संगीतमय अभिवादन”, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजी. पवन दवंडे यांचे “सप्तखंजेरीतून समाजप्रबोधन”, प्रकाशदीप वानखेडे यांचा “संविधानाचा आलाप”, कुणाल वराळे आणि राधा खुडे यांचा “गाथा युगपुरुषाची”, अभिजित कोसंबी प्रसेनजीत कोसंबी, आणि कविता राम आणि  निवेदक डॉ.सत्यजित कोसंबी यांचा “जयभीमचा नारा” इत्यादी कर्यक्रम संपन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.