Pimpri News : आमदार जगताप यांचा राष्ट्रवादीला दे धक्का! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपळे गुरवमध्ये राजकीय धक्का दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल आणि त्यांचा मुलगा अमर आदियाल यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 6) भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप हे येत्या काही दिवसांत चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक राजकीय धक्के देण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय संकेत दिले आहेत.

शोभा आदियाल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर भागाचे 2007 ते 12 या काळात त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी आपला मुलगा अमर आदियाल यांच्यासह रविवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. पिंपळेनिलख येथे शोभा आदियाल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचेही पक्षात स्वागत केले. शोभा आदियाल यांच्या प्रवेशामुळे पिंपळेगुरव व सुदर्शननगरमध्ये भाजपचे राजकीय बळ वाढणार आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी शोभा आदियाल यांचा भाजप प्रवेश घडवून आणत पिंपळेगुरव भागात राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विरोधी पक्षाच्या अनेकांची अक्षरशः रांग लागलेली आहे, असा दावा जगताप समर्थकांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.