Chikhali News : पूर्णानगरमध्ये भाजप राष्ट्रवादी आमनेसामने; पोलिसांकडून लाठीचार्ज

एमपीसी न्यूज – पूर्णानगर चिखली येथे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. राष्ट्रवादी आंदोलनाच्या तर भाजप कार्यकर्ते उद्यानाच्या उदघाटनाच्या निमित्ताने आमनेसामने आले. दरम्यान राष्ट्रवादीचे आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. मात्र याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे रविवारी माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटने केली. फडणवीस यांच्या हस्ते पूर्णानगर चिखली येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाचे उदघाटन झाले.

दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील पाच वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक मोठ्या प्रमाणात उद्यानाच्या बाहेर जमा झाले. आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. त्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी केली.

दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांना आवरताना एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळली.

चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर म्हणाले, राष्ट्रवादीने पूर्णानगर येथे आंदोलन केले. त्याच वेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाच्या उदघाटनासाठी येणार असल्याने भाजप कार्यकर्ते देखील आले होते. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. कुणालाही ताब्यात घेतले नसल्याचेही बाबर यांनी सांगितले.

काँग्रेसकडूनही निषेध

केएसबी चौक येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचे स्थलांतर आणि इतर अनुषंगिक कामाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची हस्ते झाले. फडणवीस कार्यक्रमाच्या ठिकाणी आले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत फडणवीस यांच्या ताफ्याला वाट करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.