PM Modi Pune Visit : शिवरायांचा जयघोष अन् पंतप्रधान मोदींचे वंदन!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज – ढोलताशांचा गजर… तुतारीचा निनाद आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात महापालिकेच्या हिरवळीवर साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मोदींनीही शिवरायांना वंदन करत आणि पुष्प अर्पण करत मानवंदना दिली. भारावलेल्या आणि अंगावर रोमांच उभा करणाऱ्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिकेच्या हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा साकारण्यात आला असून याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे या पुतळा स्मारकाची पायाभरणी गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आली होती.

पुतळा अनावर सोहळ्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. गिरीश बापट, आ. चंद्रकांत पाटील, उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजप पक्षनेते गणेश बिडकर महानगरपालिकेचे सभासद आणि उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महापालिका आवारात आगमन होताचा त्यांचे स्वागत पुणेरी ढोलताशांच्या गजराने आणि तुटरीच्या निनादाने करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ हे पंतप्रधान मोदींना घेऊन प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यावर महापौर मोहोळ यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्याची प्रतिकृती आणि खास मराठमोळा फेट्याने पुणेकरांच्या स्वागत केले.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य करताना आदर्श कारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. पुणे शहराचा गाडा हाकत असताना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर असावा आणि महापालिका कारभाऱ्यांना सातत्याने प्रेरणा मिळत राहावी, या उद्देशाने महापालिका मुख्यालयात पुतळा असावा, अशी मनोमन इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. भूमिपूजनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि अनावरणासाठी पंतप्रधान मोदी यांनी वेळ दिला हेही अत्यंत महत्त्वाचे होते”.

अन् पंतप्रधान मोदी थेट नगरसेवकांना भेटले!

पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमास नगरसेवकांचीही उपस्थिती होती. मात्र राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांमुळे नगरसेवकांसाठी वेगळी जागा उपलब्ध केली होती. मात्र या नगरसेवकांना आपण भेटावे अशी विनंती महापौर मोहोळ यांनी पंतप्रधान मोदींना केली. मोदीही या विनंतीला साद देत थेट नगरसेवकांच्या भेटीला पोहोचले. यावेळी मोदींची छबी टिपण्याचा आणि सेल्फीचा मोह नगरसेवकांना आवरता आला नाही. महापौरांच्या विनंतीवरुन थेट पंतप्रधान भेटीला आल्याने नगरसेवकांच्याही आनंदाला पारावर उरला नव्हता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.