Pimpri News : गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – श्रद्धा, भक्तीभाव आणि आनंद यांचा सुरेख संगम म्हणजे गणेशोत्सव होय.हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी मांडलेल्या संकल्पना पर्यावरणाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण आहेत.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास त्यातून पर्यावरणाच्या चळवळीला अधिक चालना मिळेल, गणेशोत्सव आनंदाचा उत्सव असून हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा अशी अपेक्षा  महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केली.

31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत सर्वत्र गणेशोत्सव साजरा होणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी काही स्वयंसेवी संस्था दरवर्षी काम करतात.यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध संस्था वेगवेगळ्या प्रकारे योगदान देण्यास पुढाकार घेत आहेत.त्यादृष्टीने अशा स्वयंसेवी संस्थांनी शहरात नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. या संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत महानगरपालिका,  पिंपरी चिंचवड पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपस्थित विविध स्वयंसेवी संस्थांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप,  पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे,   सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, संजय खाबडे,  कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा,  उप आयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, स्मिता झगडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड, तनपुरे फाउंडेशन अशोक तनपुरे, प्रभाकर नेरुकर, पुनरावर्तन संस्थेच्या वृंदा शेटे, ईसीएचे प्रतिनिधी विनिता दाते, सिकंदर घोडके, स्वाती इंजे, अनिल दिवाकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत मुथियान, अलाइव्ह संस्थेचे उमेश वाघेला, पर्यावरण गतीविधी संस्थेचे स्वप्निल कुलकर्णी यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे.  गणेशोत्सव आनंदाचा उत्सव असून हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा अशी अपेक्षा आहे. यासाठी पुढाकार घेतलेल्या पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थांनी  गणेश मूर्ती विसर्जनानंतर शाडू माती अथवा इतर मातीचा  पुनर्वापर, मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन, नैसर्गिक मातीचा वापर करून गणेश मूर्ती बनवणे अशा नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या आहेत.  या संकल्पना पर्यावरणासाठी चांगल्या आहेत. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कोविड काळात अनेक नवनवीन संकल्पना राबविता आल्या. गणेशभक्त देखील पर्यावरणाच्या दृष्टीने सजग आहेत. गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृतीला अनुरूप राहून पर्यावरणाची संकल्पना राबवणे सहज शक्य आहे. यासाठी गणेशभक्तांच्या भावनेचा आदर करून त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी करून घेतले पाहिजे.  महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देताना मूर्ती संकलनाची व्यवस्था देखील विसर्जन घाटावर केली आहे. शिवाय फिरते मूर्ती संकलन रथ देखील विविध भागात ठेवण्यात येणार आहेत. गणेश विसर्जनावेळी  पर्यावरण प्रेमी संस्थांच्या स्वयंसेवकांनी  संरचनात्मक नियोजनावर भर देऊन प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असेही  आयुक्त सिंह म्हणाले.

पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले, पर्यावरणप्रेमी संस्थांनी मांडलेल्या संकल्पनांमध्ये नाविन्यता असून त्यामध्ये तथ्यदेखील आहे. या संकल्पना परिणामकारक असून त्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी गणेश मंडळांना माहिती द्यावी त्यातून निश्चितपणे सकारात्मक बदल घडतील. गणेशभक्तांच्या भावना न दुखावता पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांनी गणेशोत्सवामध्ये आपले कार्य करावे. हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासोबत  आनंदपूर्ण आणि शांततापूर्व वातावरणात पार पाडण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी पोलीस प्रशासनाला स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी  उपस्थित स्वयंसेवी संस्थांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी विविध  सूचना मांडल्या.  यामध्ये  नागरिकांनी शाडूच्या मातीपासून बनवलेले गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करून जमा झालेली माती स्वयंसेवी संस्थांकडे जमा करावी, त्या मातीचा पुनर्वापर करता येईल. विसर्जनाच्या ठिकाणी मूर्तीदान करावी, शून्य कचरा उपक्रम राबविण्यासाठी गणेश मंडळानी पुढाकार घ्यावा,  नैसर्गिक मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीचा वापर करावा, ग्रीन गणेशोत्सव संकल्पना राबवावी, निर्माल्य कुंड हे फक्त गणेशोत्सवापुरतेच मर्यादित न ठेवता ते कायमस्वरूपी ठेवावेत, आदी सूचनांचा समावेश होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.