11th HI Sr. Men Natl C’hip 2021 : पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज – हॉकी पंजाब, हॉकी उत्तर प्रदेश आणि हॉकी कर्नाटक यांनी संयमी खेळाचे प्रदर्शन करताना सफाईदार विजय मिळवून 11व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड येथील नेहरुनगर परिसरातील मेजर ध्यानचंद मैदानावर आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पंजाबने आपला शेजारी चंडिगडचा प्रतिकार 2-1 असा मोडून काढला. दुसऱ्या सामन्यात कर्नाटकाने बंगालवर 3-2 असा पराभव केला.

दोन वेळच्या विजेत्या पंजाबला आज चंडिगडचा बचाव भेदण्यासाठी झगडावे लागले. पंजाबनेही बचावावर भर देत चंडिगडच्या आक्रमकांची कोंडी केली. एकमेकांची ताकद ओळखून खेळण्याच्या प्रयत्नात मध्यंतराला गोलफलक गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरारार्धात ऑलिंपियन ब्रॉंझपदक विजेत्या रुपिंदरचा अनुभव आणि खेळ निर्णायक ठरला. त्यानेच दोन गोल नोंदवत पंजाबची उपांत्य फेरी निश्चित केली. चंडिगडचा एकमात्र गोल अर्षदीपने 50व्या मिनिटाला नोदंवला.

मध्यंतराच्या बरोबरीनंतर उत्तरार्धात सामन्याच्या 49व्या मिनिटाला रुपिंदरपालने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चारच मिनिटांनी अर्षदीपने गोल करताना चंडिगडला बरोबरी साधून दिली. पण, त्यानंतर पंजाबाच्या रुपिंदरच्या मैदानालगत आलेल्या वेगवान ड्रॅग फ्लिकला रोखताना चंडिगडच्या जशनदीप सिंग याचे प्रयत्न अपुरे पडले आणि हाच गोल निर्णायक ठरला.

त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्नाटकाने कमालीच्या चुरशीने झालेल्या सामन्यात बंगालचे आव्हान परतवून लावले. सामना संपताना 58व्या मिनिटाला अलि अन्सर याने कॉर्नवर नोंदवलेला गोल निर्णायक ठरला. त्यापूर्वी सामन्याच्या 9व्या मिनिटाला अस्लम लाक्रा याने गोल करून बंगाला सनसनाटी आघाडी मिळवून दिली होती. गोल सपाटा लावणाऱ्या कर्नाटकाने बरोबरी साधण्यासाठी 21व्या मिनिटाची वाट बघावी लागली. तेव्हा मंहमद राहिलने गोल नोंदवला. त्यानंतर 30व्या मिनिटाला हरिष मुटगर याने कॉर्नरवर गोल साधून कर्नाटकाला आघाडी मिळवून दिली. कर्नाटकाने पूर्ण स्पर्धेत प्रथमच पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवला. जिद्दीने खेळणाऱ्या बंगालने 40व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली होती.

तिसऱ्या लढतीत उत्तर प्रदेशाने हॉकी हरयानाचे आव्हान 2-1 असे परतवून लावले. पाठोपाठ झालेल्या गोलने बरोबरीत आलेल्या सामन्यात पूर्वार्धातच नोंदवलेला गोल निर्णायक ठरला. सामन्याच्या 12व्या मिनिटाला महंमद अमिर खानने गोल केल्यावर पुढच्याच मिनिटाला मनदीपने हरियानाला बरोबरी राखून दिली. सामन्याच्या 25व्या मिनिटाला महंमद सादिकने नोंदवलेल्या गोलने उत्तर प्रदेशाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आल्याने पूर्वार्धातील गोलच निर्णायक ठरला.

अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राने पेनल्टी शूट आऊटमध्ये तमिळनाडूचा पराभव केला. गोलरक्षक आकाश चिकटे महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पेनल्टीत त्याने दाखवलेला भक्कम बचाव निर्णायक ठरला. तमिळनाडूकडून चारही प्रयत्न अपयशी ठरले. तुलनेत महाराष्ट्राकडून दर्शन गांवकर यांनी आपले लक्ष्य अचूक साधून महाराष्ट्राचा विय साकार केला.

त्यापूर्वी, नियोजित वेळेत सामना 2-2 असास बरोबरीत सुटला होता. सामन्याच्या 8व्या मिनिटाला प्रताप शिंदेच्या गोलने महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. मध्यंतरापर्यंत ती त्यांनी कायम राखली. पण, त्यानंतर उत्तरार्धात दोन मिनिटांत दोन गोल करून तमिळनाडूने आघाडी घेतली होती. एस. कार्तीने हे दोन्ही गोल मारले. पिछाडीवर पडल्यानंतर मात्र महाराष्ट्राने आपला खेळ उंचावला. त्यांनी अखेरच्या मिनिटात कमालीचा आक्रमक खेळ करून तमिळनाडूच्या बचाव फळीवर दडपण आणले. याचा फायदा महाराष्ट्राला अखेरच्या मिनिटाला झाला. सामन्याच्या 60व्या मिनिटाला कर्णधार तालेब शहाने गोल करून सामना बरोबरीत सोडवला.

निकाल –

  • हॉकी पंजाब 2 (रुपिंदर पाल सिंग 46, 53वे मिनिट) वि.वि. हॉकी चंडिगड 1 (अर्षदीप सिंग 50वे मिनिट)
  • हॉकी कर्नाटक 3 (मोहंमद राहिल 21वे, हरिष मुटगर 30वे,अली अन्सर 58वे मिनिट) वि.वि. हॉकी बंगाल 2 (अस्लम लाक्रा 9वे, अभिषेक प्रताप सिंग 40वे मिनिट)
  • हॉकी उत्तर प्रदेश 2 (महंमद अमिर खान 12वे, महंमद सादिक 25वे मिनिट) वि.वि. हॉकी हरियाना (मनदीप 13वे मिनिट)
  • हॉकी महाराष्ट्र 2 (2) (प्रताप शिंदे वे, तालेब शहा वे मिनिट) (शूट-आऊट दर्शन गावकर, व्यंकटेश केंचे) वि.वि. हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू 2 (0) (कार्ती एस 46वे, 48वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.