Vadgaon Maval : नम्रता स्वभावात आणि कर्मातही असायला हवी – डॉ. मोनिका ठक्कर

एमपीसी न्यूज – माणसामध्ये नम्रता असणं खूप गरजेचे आहे. ती नम्रता स्वभावातच नव्हे तर कर्मातही असावी लागते. आमची मराठी माणसं रिक्षा चालवणं कमीपणाचं समजतात, भाजी विकणं, दुध विकणं हे कमीपणाचं समजून काम सोडून बसतात आणि परप्रांतीय तेच काम मनोभावे करतात. चोरी करणं आणि भीक मागणं या व्यतिरिक्त कुठलंही काम कमीपणाचं नाही. व्यसनाधीनता आणि जंगफुड हे आजच्या पिढीला मिळालेले शाप आहेत, असे मत मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. मोनिका ठक्कर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमप्रसंगी ठक्कर यांनी भारूड शब्दाच्या उगमापासून भारुडाची महती सांगितली. प्रयोगात्मक कलेत लोककलेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे म्हणत डॉ. ठक्कर यांनी लोककला, सभ्य आचरण, कामाप्रती निष्ठा आदी विषयांवर सुद्धा प्रतिपादन केले.

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेस गुरुवारी (दि. ७) घटस्थापनेच्या दिवशी सुरुवात झाली. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प डॉ. मोनिका ठक्कर यांनी गुंफले. ‘भारूडातील स्त्री रूपे’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे, प्रमुख पाहुण्या वडगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर होत्या.

यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, अ‍ॅड तुकाराम काटे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, संस्थापक कार्याध्यक्ष डाॅ रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे अध्यक्ष शंकर भोंडवे, नंदाताई सातकर, विठ्ठल घारे,माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, नामदेव भसे, नगरसेवक अ‍ॅड विजय जाधव, अ‍ॅड अजित वहिले आदी उपस्थित होते

प्राचीन काळापासून समाजप्रबोधनाचे माध्यम असलेल्या लोककलेतील भारुड कलाप्रकाराचे महत्त्व प्रतिपादित करताना संत वाङ्मयातील भारुडामधील स्त्री पात्रे हीच लोकसंस्कांराची केंद्र होती हे अधोरेखित करतानाच भारुडातील शब्दांचा गर्भार्थ डॉ.मोनिका ठक्कर यांनी व्याख्यानात उलगडून सांगितला.

‘लाडकी लेक मी संताची’ या भारूडातील आशय सांगताना डॉ ठक्कर म्हणाल्या की, ‘बायका अखंड चुडा घालतात. त्यातील एखादी बांगडी जर टिचकली तर ती आपण काढून फेकून देतो, परंतु संत सांगतात की, आपल्याला जो देह मिळाला आहे. याला अख्खयी चुड्याची उपमा दिली आहे.’

या चुड्याला आपण फक्त टिचकवतच नाही तर आजची नवीन पिढी सडवते आहे, व्यसनाने! दारु, सिगारेट, गांजा, जंकफूड, फास्टफूड या धावपळीच्या जगात आपल्याला मिळालेला शाप आहे. हा अख्खयी चुडा टिकून आहे तो अक्कण मोतीच्या आधारावर.

आता हा अक्कण मोती म्हणजे शरीराला जगण्यासाठी ऑक्सिजन, प्राणवायू लागतो आणि हा नाकाच्या माध्यमाने आपल्याला सहज घेता येऊ शकतो. या देहरूपी शरीराला श्वासरूपी मोती मिळाला आहे.

तसेच बोध मुराळी श्रृंगारीला आणि चौऱ्याऐंशीचा शिक्का केला, म्हणजे व्यवहारिक जीवनामध्ये लेकीला आणायला जाणाऱ्या व्यक्तीला मुराळी म्हणतात. आणण्यासाठी आलेला मुराळी विश्वासपात्र नसेल तर सासरची मंडळी
आपल्या सुनेला पाठवत नाही. या व्यवहारातील गोष्टी आम्हाला बरंच काही शिकवून जातात.

लोकमानस बघा किती श्रेष्ठ आहे, जर एखादा व्यक्ती संशयास्पद सवाटला, जर आपली सून त्याला ओळखत नसली तर त्या मुराळी सोबत सासरची मंडळी आपल्या नवीन सुनेला पाठवत नाहीत; परंतु आम्ही अनेक परक्या आणि संशयास्पदच नव्हे अगदी स्पष्ट माहीत असूनही चिनी वस्तू स्वीकारतो. आपल्या भारतमातेला हा देश परका आहे. ती त्याला ओळखत नाही तरी आपण त्या मातेला त्या परक्याच्या हाती स्वाधीन करतो कशासाठी? आपल्या सुख-सोईसाठी अशी उदाहरणे ठक्कर यांनी दिली.

दरम्यान, ‘आग्रा ते राजगड ‘ गरूडझेप मोहीम पायी चालत पुर्ण करणाऱ्या गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था,वडगाव मावळ येथील मावळयांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत शंकर भोंडवे यांनी केले. प्रास्ताविक डॉ.रवींद्र आचार्य यांनी केले तर सुत्रसंचालन वैशाली ढोरे,कांचन ढमाले यांनी केले व आभार संगीता ढोरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.