KKR vs RR : अखेर कोलकाता संघाने तोडली पराभवाची शृंखला, राजस्थान वर मिळवला 7 गडी राखुन रॉयल विजय

(विवेक दि. कुलकर्णी) : एक मजबुत संघ म्हणून ओळखला जाणारा आणि माजी विजेता असलेल्या केकेआर संघाची यावर्षीच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी कामगीरी होत नव्हती. त्यामुळे त्यांचे चाहते निराश होत होते. पण काल त्यांनी सर्वांगसुंदर खेळ करत बलाढय राजस्थान रॉयल्स संघाला दणदणीत मात देऊन पराभवाची शृंखला तोडण्यात यश मिळवले आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात कोलकाता साठी नाणेफेक जिंकण्यापासून ते सामना जिंकण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अनुकूल होत गेली, कर्णधार श्रेयसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आणि त्याच्या सर्वच गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत बलाढ्य राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना फक्त 152 धावांवर रोखून कर्णधाराच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला सार्थ ही ठरवले.

राजस्थान साठी या स्पर्धेतला सर्वोच्च धावा करणारा बटलर आणि पडीकल यांनी डावाची सुरुवात केली,मात्र पडीकल फक्त दोन धावा करून उमेशच्या गोलंदाजीवर त्याच्याच हातात झेल देऊन बाद झाला,आणि राजस्थानला पहिला मोठा धक्का  बसला.त्यानंतर बटलर आणि संजूने पुढे खेळताना दुसऱ्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या, आणि वैयक्तिक 22 धावा करुन बटलर टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्याच्या जागी आलेल्या करुण नायरने कर्णधार संजूला साथ देत तिसऱ्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला खरा,पण करूण नायर फक्त 13 धावा करून अरुल रॉयची शिकार झाला,मात्र संजूने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत आपले 17 वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर लगेचच तो 54 धावावर असताना शिवम मावीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यावेळी राजस्थान संघाची धावसंख्या 18 व्या षटकात 5 बाद 115 अशी होती, मात्र हेटमायरने आक्रमक शैलीत 27 धावा काढल्या, ज्यामुळे राजस्थान संघाची धावसंख्या 20 षटकानंतर 5 बाद 152 अशी झाली,केकेआर साठी साउदीने दोन तर मावी,उमेश आणि रॉयने प्रत्येकी एक गडी बाद केला.

उत्तरादाखल खेळताना केकेआरचीही सुरुवात अतिशय खराब झाली, अरॉन फिंच फक्त चार धावा काढून कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर बाद झाला,तर त्याचा जोडीदार बाबा इंद्रजितही फक्त 16 धावा करून आपली विकेट प्रसिद्ध कृष्णाला देऊन तंबुत परतला,यावेळी केकेआरची अवस्था 2 बाद 32 अशी होती.

यानंतर मात्र कर्णधार श्रेयस आणि नितीश राणा या जोडीने जबरदस्त खेळ करत तिसऱ्या गड्यासाठी 60 धावा जोडून संघाला विजयाची आस दाखवली, श्रेयस चांगले खेळत असतानाच 34 धावा करून बोल्टची शिकार ठरला, आणि सामना पुन्हा रंगतदार अवस्थेत आला,मात्र नितीश राणा आणि सामनावीर ठरलेल्या रिंकू सिंगने जबरदस्त फलंदाजी करत आणखी पडझड होवू दिली नाही आणि चौथ्या गड्यासाठी नाबाद 67 धावांची अखंडित भागीदारी करून केकेआर चौथा विजयही मिळवून दिला.

राणाने 37 चेंडूत आक्रमक 48 धावा केल्या तर रिंकूने फक्त 23 चेंडूत 6 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 42 धावा केल्या, या विजयाने केकेआरच्या संघात नवचैतन्य फुलो आणि त्यांनी आपल्या उर्वरित सामन्यात अशीच विजयी कामगीरी करून प्ले ऑफ साठी पात्र होवो अशी अपेक्षा केकेआरचे असंख्य चाहते बाळगून आहेत.राजस्थान साठी हा सलग दुसरा पराभव असला तरी त्याचे अंकतालिकेतेले तिसरे स्थान अजूनही अबाधित आहे.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स

5 बाद 152

बटलर 22,संजू 54,पराग 19,हेटमायर नाबाद 27

साऊदी 46/2,उमेश 24/1,मावी 33/1

पराभूत विरुद्ध

कोलकाता नाईट रायडर्स

3 बाद 158

श्रेयस 34,नितीश राणा नाबाद 48,रिंकू सिंग नाबाद 42

बोल्ट 25/1,कृष्णा 37/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.