IND VS AUS : दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी पत्करली शरणागती

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांची शरणागती, ऑस्ट्रेलिया विजयाच्या समीप की भारतीय फिरकी करणार चमत्कार?
पहिल्या डावात केलेली लाजिरवाणी कामगिरी भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीने काही प्रमाणात का होईना झाकोळून गेली असली तरी बलाढ्य म्हणून मिरवणारी आणि विश्वकप कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची आशा बाळगणारी भारतीय फलंदाजी दुसऱ्या डावातही बहरली नाही ती नाहीच, अवघ्या 163 धावांवर भारतीय संघ गारद झाला आणि ऑस्ट्रेलियन संघाला मालिकेतल्या पहिल्या विजयाची आशा खुणावू लागली.

उद्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाला विजयासाठी केवळ 76 धावांची गरज असली तरी या खेळपट्टीचा रागरंग बघता या धावाही अगदीच मामुली नसतील. त्यामुळेच फलंदाजांनी केलेल्या अपयशी आणि अवसानघातकी कामगिरीला विसरत जडेजा आणि अश्विन काही कमाल करून दाखवणार की ऑस्ट्रेलियन फलंदाज आपल्या दर्जाला न्याय देत आपला पहिला विजय मिळवणार हे बघणे मनोरंजक ठरेल.

आज सकाळी ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळ कालच्या 4 बाद 156 वरून पुढे सुरू केला. काल नाबाद असलेल्या हँडस्कोंब आणि ग्रीन या जोडीने आज सकाळी आत्मविश्वासपूर्वक खेळ करून भारतीय संघाला बरेच सतावले. ही जोडी रोहित शर्माच्या डोक्याचा ताप वाढेल असेच खेळत होती. एरव्ही कुशल नेतृत्व करणाऱ्या रोहितला आज पहिल्यांदाच कर्णधाराची दडपणाखाली काय अवस्था असते याचा अंदाज आला असावा. त्याचे निर्णयही अचंबित करणारे होते.

अनुभवी अश्विनला आणण्याऐवजी त्याने जडेजा आणि अक्षरलाच गोलंदाजी करायला लावून सर्वानाच आश्चर्यचकित केले. अखेर त्याने आपली चूक दुरुस्त केली आणि रवी अश्विनला गोलंदाजी दिली. त्यानेही कर्णधाराला निराश न करता अगदी थोड्याच वेळात हँडस्कोंबला वैयक्तिक 19 धावावर बाद करून भारतीय संघाला एकूण 5 वे आणि आजच्या दिवसातले पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर थोड्याच वेळात उमेश यादवनेही आपल्या मायदेशातल्या लौकिकाला जागत ग्रीनला बाद केले आणि त्यानंतर थोड्याच वेळात मिशेल स्टार्कला त्रिफळाबाद करुन भारतीय संघात नवचैतन्य निर्माण केले. ही विकेट त्याच्यासाठी अविस्मरणीय असेल.

कारण उमेश यादवने ग्रीनला पायचीत करून तंबूत परत पाठवताना मायदेशातली आपली 100 वी कसोटी विकेट मिळवून आपले नाव क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात सोनेरी अक्षराने गोंदवले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथाच वेगवान गोलंदाज आहे. आजची पहिली विकेट मिळवून देणाऱ्या अश्विननेच मग ऑस्ट्रेलियन शेपूट अतिशय स्वस्तात गुंडाळून भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघ फार मोठी आघाडी घेईल या भीतीपासून सुरक्षित ठेवले. या दोघांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ केवळ 197 धावाच जमवू शकला, तरीही या मैदानावर त्यांनी पहिल्या डावात 88 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून बलाढ्य भारतीय संघावर एकप्रकारे नैतिक विजय मिळवला असे म्हणाले तर त्यात फारसे गैर असणार नाही.

भारतीय संघाकडून सर्वाधिक 4 विकेट्स जडेजाने मिळवल्या तर उमेश व अश्विन यांनी प्रत्येकी तीन तीन गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली. अक्षरची पाटी यावेळीही कोरीच राहीली. उपहाराच्या आधी केवळ 15 मिनिटे आधीच कांगारू संघ बाद झाल्याने पंचानी उर्वरित 10 मिनिटासाठी भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे सांगितले. कर्णधार रोहित आणि गील यांनी ती महत्वपूर्ण 4 षटके धीराने खेळून काढली आणि नाबाद 13 धावा जमवत बऱ्यापैकी चांगली सुरुवातही केली. मात्र, हा आनंद अगदीच क्षणिक ठरला.

उपहारानंतरच्या पहिल्याच षटकातच खूप चर्चा/वादंग उठवून संघात के.एल.राहुल ऎवजी आलेल्या गिलला लायनने केवळ 5 धावांवर असताना बाद करुन भारताला पहिला मोठा धक्का दिला. पहिल्या डावात 21 धावा करणाऱ्या गीलला दुसऱ्या डावातही विशेष कामगिरी करता आली नाही अन तो फक्त 5 च धावा करुन बाद झाला.या निराशाजनक सुरुवातीनंतर आपल्या कर्णधाराला साथ देण्यासाठी आणि संघाची संकटाच्या भोवऱ्यात अडकलेली नौका पैलतीरावर सुखरूप पोहचवण्यासाठी मैदानावर आला तो अनुभवी चेतेश्वर पूजारा.

त्यानेच भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातला पहिला चौकार मारत आश्वासक सुरुवात केली. या जोडीने दहा षटके संयमाने खेळून काढली पण लायननेच पुन्हा एकदा रोहितला एका अप्रतिम फिरकी चेंडूवर चकवले आणि तो वैयक्तिक 12 धावांवर पायचीत झाला. लायनने रोहितला आपल्या कारकिर्दीत एकूण आठव्यांदा बाद केले आहे. हा भारतीय संघासाठी फार मोठा धक्का होता. कारण अजूनही ऑस्ट्रेलियन संघाकडे 56 धावांची आघाडी होती आणि भारतीय फलंदाज विदेशी खेळाडूसारखे फिरकीच्या जाळ्यात अडकत आहेत हे डोळ्याला विश्वास न बसणारे चित्र नव्हे वास्तव खऱ्या क्रिकेटरसिकांना बघावे लागत होते.

रोहीतच्या जागी विराट खेळायला आला, त्याने आल्याआल्या पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत सुरुवात तरी चांगली केली. मात्र, त्याला आजही मोठी खेळी करण्यात यश आले नाही. पुजारासोबत केवळ 22 धावांची छोटी भागीदारी करुन तो वैयक्तिक 13 धावा करुन कुनेमनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. एकदिवसीय क्रिकेटसामन्यात जरी त्याचे अपयश संपले असले तरी कसोटी क्रिकेटच्या खेळात मात्र त्याला अजूनही यश लाभलेले नाही. आजही संघाला गरज असताना त्याची बॅट खामोशच राहिली, त्यातही त्याचे फिरकी गोलंदाजांविरुद्ध सतत बाद होणे.

त्याच्या दर्जाला शोभणारे नाही. तो बाद झाला तेंव्हा भारतीय संघाची अवस्था चार बाद 54 अशी होती आणि अजूनही भारतीय संघ 34 धावांनी पिछाडीवर होता. कोहली नंतर खेळायला आला तो श्रेयस अय्यर, ज्याचे भलेही या मालिकेतले योगदान विशेष नसले तरी मागील दोन वर्षात तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या तीन फलंदाजामधे आहे.त्याने एक उत्तुंग षटकार मारत आपले खाते उघडले आणि त्यानंतरही त्याने अशाच आक्रमक आणि आकर्षक अंदाजात खेळायला सुरुवात केली. त्याच्या आक्रमक फलंदाजीमूळेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन आघाडी कमी करुन आपली आघाडी वाढवली.

त्याच्या खेळीने भारतीय संघाला आशा वाटू लागलेली असतानाच स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याचा ख्वाजाने अप्रतिम झेल घेत त्याची छोटी पण स्फोटक खेळी संपुष्टात आणली. हा झेल इतका अविश्वसनीय होता की पंचानी तो झेल आहे की नाही हे स्पष्ट करुन घेण्यासाठी तिसऱ्या पंचाचा निर्णय घेतला, मात्र भारतीय संघाच्या दुर्दैवाने ख्वाजाने तो झेल अतिशय सफाईने घेतला होता. अय्यरने 27 चेंडूत 3 चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारत 26 धावा केल्या,पण त्या भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. दुसऱ्या बाजूने के.एस. भरत आणि रवीचंद्रन अश्विननही स्वस्तात बाद झाले आणि भारतीय संघ 7 बाद 140 अशा बिकट परिस्थितीत सापडला.

अश्विनला बाद करून लायनने भारतात आपली 50वी विकेट मिळवली, तर डावात पाच बळी घेण्याची मोठी कामगिरी आपल्या कारकिर्दीत 23 व्या वेळी केली. यावेळी भारतीय संघाकडे 52 धावांची तुटपुंजी आघाडी होती. या सर्व पडझडीतही पुजारा अतिशय धीरोदात्तपणे आणि संयमाने खेळत होता. एका बाजुने एकेक गडी धारातीर्थी पडत असताना पुजारा मात्र आपल्या लौकिकाला सार्थ जागत नेटाने लढत होता. त्यामुळेच त्याने या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर एक जबरदस्त खेळी करत आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत आपले कसोटीतले महत्वही पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

हे त्याचे 35 वे अर्धशतक आहे. मात्र दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी, तशी साथ कोणीही दिली नसल्यानेच भारतीय संघ या कसोटीत तरी चांगलाच अडचणीत सापडला असल्याचे चित्र आता तरी दिसत आहे.भारतीय संघासाठी तारणहार ठरत असलेला पुजारा ऑस्ट्रेलियन संघाच्या पहिल्या विजयातला मोठा अडसर ही ठरत होता. जोपर्यंत तो मैदानावर पाय घट्ट रोवून मैदानात होता तोवर भारतीय संघाला आघाडीत आणखीन भर पडेल ही आशा वाटत होती, मात्र वैयक्तिक 59 धावांवर असताना लायनच्या गोलंदाजीवर बदली कर्णधार स्मिथने त्याचा आणखी एक अविश्वसनीय झेल घेत पुजाराची झुंजार आणि एक अविस्मरणीय खेळी समाप्त करत संघासाठी विजयाचा मार्ग आणखीनच प्रशस्त केला.

पुजारा बाद झाला अन लगेचच उमेशही आल्या पावली लायनच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्याचवेळी भारतीय संघाची 9 वा गडीही बाद झाला अन भारतीय संघ पुरता संकटात सापडला. याच विकेटससोबत त्याने सर्वाधिक भारत ऑस्ट्रेलियन संघामधल्या आतापर्यंतच्या मालिकेतला आपला 112 वा बळी मिळवून या यादीत आपले नाव प्रथम क्रमांकावर कोरले आहे. त्याने कुंबळेच्या 111 विकेट्सचा विक्रम नेस्तनाबूत करत आपले नाव सुवर्णाक्षराने कोरलेले आहे. ही त्याची दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी भारतीय संघाविरुद्ध आहे. त्यानेच सिराजलाही मोठा फटका मारण्याचे लालच दाखवले आणि अनुनभवी सिराज त्याच्या जाळ्यात अलगद फसला, त्यामुळेच भारतीय संघाचा डाव 163 धावावर संपला.

यामुळे भारतीय संघाकडे 75 धावांची आघाडी आहे. म्हणजेचऑस्ट्रेलियन संघालाया विजयासाठी 76 धावांची गरज आहे, या धावा या मैदानावर अगदीच कमी आहेत असेही नाही कारण दोन दिवसातच या खेळपट्टीने 30 विकेट्स गोलंदाजांच्या पदरात पाडून आपली दहशत दाखवली आहे, उद्या जडेजा,अश्विन कमाल करणार की ऑस्ट्रेलियन संघ आपला या मालिकेतला पहिला विजय प्राप्त करणार हे बघणे मनोरंजन ठरेल. भारतीय संघ दुसऱ्या डावात सर्वबाद झाल्यावर पंचांनी आजच्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्याचे घोषित केले.

संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव सर्वबाद 109
ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 197
ख्वाजा 60,लाबूशेन 31,स्मिथ 26,हँडस्कोंब 19,ग्रीन 21
अश्विन 44/3,उमेश 12/3,जडेजा 78/4
भारत दुसरा डाव सर्वबाद 163
रोहित 12,कोहली 13,श्रेयस 26,जडेजा 7,अश्विन 16,पुजारा 59,अक्षर नाबाद 15
लायन 64/8

विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.