India Vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने पहिल्यांदाच विंडीज संघाला व्हाईटवॉश देत मिळवला 96 धावांनी मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) – धोनी,गांगुली, कोहली या भारताच्या मोठमोठया आणि यशस्वी कर्णधारांना जी गोष्ट जमली नाही, ती करामत रोहीत शर्माने आपल्या पहिल्याच मालिकेत आज करून दाखवली. आजतागायत एकदाही भारताला विंडीज संघाला व्हाईटवॉश देता आला नव्हता, ते काम करून आज रोहीत शर्माने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मानाचा शिरपेच रोवला आहे. विंडीजविरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून रोहीत शर्माचे नाव क्रिकेट इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिले जाईल.

आजच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघ बदल करणार हे निश्चित होतेच. आजही रोहीतने नाणेफेक जिंकली आणि एक, दोन नव्हे तर संघात तब्बल तीन बदल करत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज भारताने दीपक चहर, कुलदीप यादव आणि शिखर धवनला अंतीम संघात स्थान देताना, शार्दूल ठाकूर, दीपक हुडा आणि के एल राहुलला विश्रांती दिली तर वेस्ट इंडिज संघाने हेडन वॉल्शला अकिल हुसेनच्या जागी स्थान दिले.

मालिका जिंकून जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास सातवे आसमाँन पे होता, पण कदाचित आत्मविश्वास आणि अति विश्वास यातला फरक त्यांना कळला नाही की काय असे वाटावे अशी खराब सुरुवात आज भारतीय बिनीच्या फलंदाजांनी केली. बर असेही नव्हते की त्यांना अप्रतिम चेंडु पडले, मात्र खराब फटके मारत भारतीय फलंदाज बाद होत होते,कर्णधार रोहीतला उभ्या उभ्या खेळायची घाई नडली आणि जोसेफचा चेंडू त्याला चकवून यष्टीचा वेध घेवून गेला.

त्याने केवळ 13 धावा काढल्या विराटचे अपयश आजही चालूच राहिले. जोसेफचने त्याला शून्यावर बाद केले.शिखर धवनलाही विशेष काही करून दाखवता आले नाही आणि स्मिथने त्याची खेळी केवळ दहा या वैयक्तिक धावसंख्येवरच संपवली. या पडझडीमुळे भारतीय संघाची अवस्था दहाव्या षटकाच्या आतच तीन बाद 46 अशी झाली होती. या कठीण परिस्थितीतून डाव सावरला तो श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने.

चौथ्या गड्यासाठी 110 धावांची शतकी आणि समाधानकारक भागीदारी करुन या दोघांनी डाव बऱ्यापैकी सावरला. दोघेही चांगलेच स्थिरावले होते. श्रेयसने आपले नववे तर ऋषभने आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले होते. ही जोडी चांगली सेट झाली आहे आणि आता ते मोठया खेळीकडे वाटचाल करत आहेत असे वाटत असतानाच पंत 56 या वैयक्तिक धांवावर वॉल्शच्या चेंडूवर चकला आणि चेंडू बॅटची कड चाटत यष्टीरक्षक शाय होपच्या हातात जावून विसावला.

यावेळी भारतीय संघाची स्थिती चार बाद 152 अशी बऱ्यापैकी चांगली होती आणि अजून सूर्यकुमार यादव, श्रेयस, दीपक चाहर असे चांगले फलंदाज बाकी होते. दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला आज मात्र तशी फलंदाजी करण्यात अपयश आले आणि तो केवळ 6 धावा काढून एलनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यर व वोशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरला असे म्हणे पर्यन्तच अय्यर जम बसल्यावर सुद्धा एक खराब फटका मारून वॉल्शच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 80 धावा काढून बाद झाला.

यावेळी केवळ 37 षटकाचाच खेळ झाला होता आणि भारतीय संघ फक्त 187 धावा जमवू शकला होता,अडीचशे तरी धावा होतील का अशी आशंका मनाला भेडसावत होती पण थँक्स टू दीपक चाहर,त्याने जबरदस्त फलंदाजी करत आक्रमक शैलीत चेंडूगणिक धाव काढत दोन उत्तुंग षटकार आणि चार चौकार मारत 38 धावा केल्या.त्याला सुंदरनेही 34 चेंडुत 33 धावा काढुन सुंदर साथ दिली.

ज्यामुळे भारतीय संघाने आपल्या निर्धारित 50 षटकात 265 धांवाचे मोठे लक्ष्य पाहुण्या विंडीज संघाविरुद्ध ठेवण्यात यश मिळवले. विंडीज कडून जेसन होल्डरने सर्वाधिक चार विकेट्स तर जोसेफ आणि वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स प्राप्त केल्या. नवोदित स्मिथ आणि एलनने सुद्धा एकेक गडी बाद केला आणि भारतीय संघाला बऱ्यापैकी रोखण्यात यश मिळवले.

विंडीज संघाला आपला आत्मसन्मान टिकवून ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात तरी विजय मिळवणे गरजेचे होते, त्यामुळेच ते कसे खेळतील याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले होते. ब्रेंडन किंग आणि शाय होप यांनी विंडीज डावाची सुरूवात केली, मात्र डावाच्या तिसऱ्याच षटकात होप पाच धावा काढून सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत झाला, तर किंग 13 चेंडूत 14 धावा काढुन चाहरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारच्या हातात झेल देऊन बाद झाला.

यावेळी विंडीजची अवस्था 2 बाद 25 अशी होती,या धावसंख्येत भर पडण्याआधीच दीपकने याच षटकातल्या शेवटच्या चेंडूवर ब्रूक्सला शून्यावरच श्रेयस अय्यरच्या हातात झेल देऊन बाद केले आणि विंडीज संघ तीन बाद 25 अशा कठीण परिस्थितीत आला.त्यानंतर मात्र कर्णधार निकोलस पूरन आणि डँरेन ब्रावो यांनी जबाबदारी आणि आक्रमकता याचा सुरेख मिलाफ करत विंडीज डावाला थोडेफार का होईना पण सावरले.

ब्रावोच्या तुलनेत पुरन जरा जास्तच आक्रमक झाला होता.मात्र ही जोडी सुद्धा फार काळ तग धरू शकली नाही ,ब्रावोची 20 धावांची छोटीसी खेळी कृष्णाने कोहलीच्या हातून संपवून विंडीज संघाला चौथा धक्का दिला.या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 43 धावा जोडल्या.तो बाद झाल्यानंतर जेसन होल्डर हा माजी कर्णधार युवा कर्णधाराला साथ देण्यासाठी आला.मात्र त्यालाही कृष्णाने केवळ सहा या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून पाहुण्यांचा अर्धा संघ तंबुत पाठवण्यात मोठे यश मिळवले.

यानंतर विंडीजच्या फक्त तळाचेच फलंदाज बाकी होते,त्यामुळे ते किती वेळ तग धरतात हेच बघणे औत्सुक्याचे होते.मात्र कुलदीप यादवने लगेचच पुरनला 34 धावांवर बाद करून आणखी एक मोठा धक्का देत भारतीय संघाचा विजय आणखीन जवळ आणला.यानंतर फक्त भारतीय संघाच्या विजयाची औपचारिकताच बाकी होती.ती भारतीय संघाने तब्बल तेरा षटके आणि 96 धावांच्या मोठ्या फरकाने पाहुण्या संघाला पराभूत करत पूर्ण केली.भारतीय संघाकडून कृष्णा व ,सिराजने प्रत्येकी तीन तर यादव,आणि दीपक चाहरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

खरेतर जागतीक क्रिकेट क्रमवारीत विंडीज संघ खूप खाली आहे,त्यात भारतीय संघ मायदेशी खेळत होता, त्यामुळे काही लोक या विजयाला फारसे मोल देणार नाहीत ,पण विजय हा विजय असतो, आणि आपल्याला विंडीजवर निर्भेळ यश मिळवायला इतके वर्ष लागलेत,त्यामुळे माझ्या लेखी तरी हा विजय नक्कीच मोठा आहे,या विजयाने काही प्रमाणात तरी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वाईट पराभवाचे दुःख नक्कीच काही प्रमाणात तरी कमी होईल, नाही का?
80 महत्वपूर्ण धावा करून विजयाच्या पाया रचणाऱ्या श्रेयस अय्यर ला सामनावीर तर सर्वाधिक 9 विकेट्स घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक – 

  • भारत – सर्वबाद 265,  पंत 56,अय्यर 80,दीपक चाहर 38,सुंदर 33, होल्डर 34/4 जोसेफ,54/2
  • विंडीज – सर्वबाद 169, पूरन 34,स्मिथ 36,ब्रावो 19, कृष्णा 27/3,सिराज 29/3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.