Pimpri News : ‘स्पर्श’ची चौकशी सुरु; अहवाल आल्यावर कारवाई : आयुक्त पाटील

चौकशी समितीतील अधिका-यांची नावे सांगण्यास आयुक्तांचा नकार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या एकाही रुग्णावर उपचार केले नसताना महापालिकेला खोटी बिले सादर करणा-या स्पर्श संस्थेची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरु आहे. समितीने अद्याप अहवाल दिला नाही. अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. परंतु, चौकशी समितीतील अधिका-यांची नावे सांगण्यास आयुक्तांनी टाळाटाळ केली.  

स्पर्श संस्थेने उभारलेल्या सीसीसी सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न करता संस्थेने महापालिकेकडे 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपये एवढे बिल सादर केले होते. यावर हे बिल चुकीचे असून संस्था महापालिकेची फसवणूक करत असल्याचा शेरा एक लिपिकाने दिला होता. मात्र, हे सर्व डावलून महापालिकेने स्पर्श संस्थेला 3 कोटी 29 लाख 40  हजार रुपये  बिल अदा केले. या प्रकारामुळे महापालिकेच्या आणि थेट आयुक्तांच्या कारभारावरच मोठ्या प्रमाणात टीका झाली. ठेकेदारांच्या फायद्यासाठीच आयुक्त हे सर्व करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला.

स्पर्शचे प्रकरण चांगलेच गाजत असल्याने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बदलीच्या दिवशी (दि. 12) स्पर्श संस्थेच्या सीसीसी सेंटरच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात संदिग्धता दिसत असल्याने या प्रकरणी चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेची उर्वरित बिले देण्यास मज्जावही केला होता. चौकशीत संस्था दोषी आढळल्यास दिलेली बिले वसूल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

चौकशी समिती नेमणून 15 दिवस उलटले. चौकशी समितीचा अहवाल आला का याबाबत विचारले असता आयुक्त पाटील म्हणाले, ”स्पर्श संस्थेची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरु आहे. समितीने अद्याप अहवाल दिला नाही. अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल”. परंतु, चौकशी समितीत कोणते अधिकारी आहेत. याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.