Chinchwad News : मोरया गोसावी हे भगवंताशी एकरुप झालेले संत – जगद्गुरु शंकराचार्य

एमपीसी न्यूज – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी भगवंताशी एकरुप झालेले अति उच्च दर्जाचे संत होते. भगवंताशी एकरुप, लीन झाले हे मोरया गोसावींचे वैशिष्ट आहे. त्यांच्या पदपस्पर्शाने पिंपरी-चिंचवडनगरी ओळखली जाते. मोरया गोसावींचा संजीवन समाधी सोहळा 460 वर्षांपासून सुरू असून हा अखंडपणे सुरु राहील, असा विश्वास कोल्हापूर करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांनी व्यक्त केला.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे आज (मंगळवारी) शंकराचार्य यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मूर्ती पूजन आणि दिप प्रज्वलाने महोत्सावाला सुरुवात झाली.

25 डिसेंबर 2021 पर्यंत होणा-या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. महापौर उषा ढोरे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत सोपान देव महाराज संस्थानचे अध्यक्ष त्रिकुण महाराज गोसावी, म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्ष माधुरी भेलके, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश याप्रसंगी उपस्थित होते.

तसेच उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, देवस्थानचे विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर शेडगे, गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, गणेशाची सर्व माहिती असलेल्या दिनदर्शिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. पंडित जसराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

”गणपती अर्थवशिर्ष केवळ पाठ करणे गरजेचे नाही. त्याचे अंतरंग बघितले पाहिजे. सत्यता, श्रद्धा बळकट असली”, असे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी म्हणाले.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ”श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण आहे. देवाजवळ पोहोचण्याचे ठिकाण म्हणजे मोरया गोसावींचे मंदिर आहे. मोरयांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. चिंचवडगावात सतत धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्याचा आपल्याला अभिमान आहे. बाहेरच्या शहरात गेल्यावर ओळख सांगताना मोरया गोसावींच्या शहरातून आलो असल्याचे आपण सर्वजण सांगतो. महापालिकेच्या माध्यमातून देवस्थानला सर्व मदत करण्याची ग्वाही मी देते”.

अभय टिळक म्हणाले, मोरयांच्या कृपेने, गणपतीबाप्पांच्या आशिर्वादाने कोरोना नामक पसरलेले अंधःकार लवकरात लवकर संपवा अशी प्रार्थना करतो. बुद्धी शुद्ध, प्रबळ आणि प्रसादयुक्त व्हावी अशी प्रार्थना करतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त विनोद पवार यांनी केले. विश्वस्त विश्राम देव यांनी ट्रस्टच्या उपक्रमांची आणि कोरोना कालावधीत केलेल्या कामाची माहिती दिली. अनिल साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर, विश्वस्त हभप आनंद तांबे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.