Pimpri News: अखेर काँग्रेसला शहराध्यक्ष मिळाला; कैलास कदम यांची शहराध्यक्षपदी वर्णी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसला 11 महिन्यांनी शहराध्यक्ष मिळाला आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के.सी.वेणूगोपाल यांनी निवडीची घोषणा केली आहे.

तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 11 नोव्हेंबर 2020 रोजी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतरही 11 महिने त्यांच्याकडेच जबाबदारी दिली होती. साठे यांची राज्य कार्यकारिणीत सचिवपदी वर्णी लागली. त्यानंतर काँग्रेसने शहराध्यक्षपदी कदम यांची निवड केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांची निवड महत्वाची मानली जात आहे.

कदम यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्या पदावर काम केले आहे. ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी कामगार क्षेत्रात अतिशय भरीव काम केले आहे. तसेच त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांची शहराध्यक्षपदी निवड झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.