Chinchwad News : संवादाअभावी माणूस हास्यानंदाला पारखा – चंद्रशेखर धर्माधिकारी

एमपीसी न्यूज – तंत्रज्ञानाची भरारी अन् संगणकाची साथ यामुळे प्रत्यक्ष संवादाअभावी माणूस हास्यानंदाला पारखा होतो आहे, अशी खंत ज्येष्ठ एकपात्री कलावंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘हास्यतडका’ या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अंतिम पुष्प गुंफले. माजी नगरसेवक विठ्ठल भोईर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “सर्व प्राणिमात्रांमध्ये माणूस हा एकमेव हसणारा प्राणी आहे!” असे मत व्यक्त केले. विठ्ठल भोईर यांनी, “ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनामुळे तरुणांना दिशादर्शन होते!” असे विचार मांडले.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, प्र. के. अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठीतील विनोदाचे दालन समृद्ध केले आहे, असे सांगितले. त्यापैकी अत्रेंचे विनोद वर्मी घाव घालणारे तर पुलंचे विनोद हे निखळ आनंद देणारे असत, या आपल्या मताला पुष्टी देण्यासाठी त्यांनी या दोन्ही प्रभृतींच्या विनोदाचे नमुने पेश केले. ‘प्रेम’ या अडीच अक्षरी भावनेवर जगातील बहुतांशी व्यवहार चालतात. प्रेमातून मुलीने घरातून पोबारा केल्यानंतर वडिलांची व्यथा मांडताना त्यांनी सुरेश भट यांच्या “केव्हातरी पहाटे…” या गीताचे “केव्हातरी पहाटे मुलगी पळून गेली…” हे विडंबन सुरेल आवाजात सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.

त्याचप्रमाणे आताच्या ऑनलाईन जमान्यात विवाहइच्छुक मुलगा-मुलगी प्रत्यक्ष भेटल्यावर दोघांचा जो अपेक्षाभंग होतो, त्यावर गदिमांच्या “प्रथम तुज पाहता…” या गीताचे फर्मास विडंबन सादर करून त्यांनी हशा पिकवला. पुणेरी पाट्या आणि स्वभावांचे इरसाल नमुने, लग्नातील चावट उखाणे, सासूबाई आणि नवी सूनबाई यांच्यातील कुरघोड्या, विवाहित मुलीच्या संसारात तिच्या आईचा हस्तक्षेप आणि त्यामुळे वैतागलेल्या नवऱ्याने “सासरचे करू लागले छळ…” या “ढगाला लागली कळ…” या चित्रपटगीतावर आधारित विडंबन, अशा विविध विडंबनांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांना हसवले. हल्लीच्या काळात घरकाम करणाऱ्या मोलकरणीचे महत्त्व अधोरेखित करताना जगदीश खेबुडकर यांच्या “देहाची तिजोरी…” या गीताच्या “घरकामाची सवय ठेवा…” हे चपखल विडंबन महिलावर्गाला विशेष भावले.

आपल्या कार्यक्रमाचा समारोप करताना चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सादर केलेल्या “पावसात भिजत होती ज्येष्ठ जोडी सुरेख…” या विडंबनगीताने श्रोत्यांना हसवत हसवत नकळत अंतर्मुख केले. गोपाळ भसे, अरविंद जोशी, नारायण दिवेकर, उषा गर्भे, जयमाला विभूते, रत्नप्रभा खोत, चंद्रकांत पारखी, सुदाम गुरव, सुधाकर कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, भिवा गावडे, हरिभाऊ क्षीरसागर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम गावडे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.