Lonavala News : भंडारा अग्नितांडव प्रकरणी सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – भंडारा अग्नितांडव प्रकरणी सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळ्यात केली.

महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चा कार्यसमिती बैठकीच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीस प्रमुख वक्ते म्हणून लोणावळ्यात आले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मे महिन्यात भंडारा येथील शासकीय रुग्णालयात फायर ट्रिटमेंटसाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली होती तो निधी शासन उपलब्ध करून देऊ शकले नाही. काल मुख्यमंत्री भंडारा येथे जाऊन नवजात बालकांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन आले मात्र त्यांना कोणतीही अतिरिक्त मदत नाही की कोणाही दोषींवर कारवाई केली नाही. हा सर्व घटनाक्रम अतिशय असंवेदनशील आहे.

फडणवीस पुढे म्हणाले बर्ड फ्लू हा रोग पाच राज्यात पसरला असून महाराष्ट्रात देखील काही भागात लागण सुरू झाली आहे. लाॅकडाऊनच्या काळात व्यावसाय बंद राहिल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आलेले असताना आता पुन्हा बर्ड फ्लूचे संकट आले आहे. या व्यावसायिकांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे. मध्यप्रदेशात नथुराम गोडसे यांच्या नावाने शाळा काढली जात आहे या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून, त्यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचे या देशात कोणीही समर्थन करू शकणार नाही. कोणी तसे करत असेल तर ते चुकीचे आहे.

कार्यसमितीच्या बैठकीत महिलांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले राजकारणात महिलांचा वाढता सहभाग पक्ष वाढीसाठी महत्वाचा आहे. सध्या महिलांना काम करण्यासाठी मोठी संधी आहे. तसेच आपले सर्व विरोधक एकत्र आल्याने त्यांची राजकीय स्पेस कमी झाली असून आपली वाढली असल्याने महिला मोर्चा व युवा मोर्चाने सक्रिय व्हावे असे आवाहन केले.

यावेळी खासदार वर्षा खडसे, आमदार विद्या ठाकूर, माधवी नाईक, कांताताई नलावडे, स्मिता वाघ, निता केळकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, दिपाली मोकाशी, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, महिलाध्यक्षा सायली बोत्रे, योगिता कोकरे, शुभम मानकामे, नगरसेवक देविदास कडू, विशाल पाडाळे, ब्रिंदा गणात्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.