Maharashtra Bandh News : पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे, उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथील हिंसाचार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधितांवर आयकर विभागाने छापेमारी करून कारवाई केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. 11) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला पिंपरी चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद आहे.

पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, चाकण, भोसरी तसेच शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही हिंसाचार होऊन बंदला गालबोट लागणार नाही याची पुरेपूर पोलीस काळजी घेत आहेत.

महाविकास आघाडीमधील सर्व घटकपक्षांच्या पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिका-यांनी सर्व व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, विविध संस्थाचे प्रमुख यांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. राज्य स्तरावर देखील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती.

पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस सेवा बंद आहे. ही सेवा आज दुपारपर्यंत बंद राहणार असल्याचे पीएमपीएमएलच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान शहरातील काही दुकाने बंद आहेत. काही दुकाने अर्ध्या शटरने सुरू आहेत. तर काही दुकाने पूर्णपणे सुरू आहेत. खासगी वाहनांमधून नागरिक नियमितपणे प्रवास करताना दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.