Maharashtra Corona Update : 18.68 लाख रुग्णांपैकी 17.47 जण झाले कोरोनामुक्त

रिकव्हरी रेट 93.52 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज, गुरुवारी दिवसभरात 3 हजार 824 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 68 हजार 172 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधित रुग्णांपैकी 17 लाख 47 हजार 199 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.52 टक्के एवढं आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात 5 हजार 8 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 47 हजार 972 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.57 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 2 हजार 427 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 18 लाख 68 हजार 172 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 41 हजार 59 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 137 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरणा पूर्ण झाल्यावर सर्व 50 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. राज्यातील 11 कोटींपैकी 3 कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.