Maval News: बारावीचा पेपर देऊन फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू 

एमपीसी न्यूज – बारावीचा पेपर देऊन फिरायला गेलेल्या मित्रांपैकी दोघांचा कासारसाई धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज सोमवार (दि.21 मार्च) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आरिष घोगी (वय 17,  रा. सोमाटणे फाटा) व विनय किसन कडू ( वय 17, रा. निगडी, मूळगाव येळसे ता. मावळ) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या  दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

शिरगाव- परदंवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळया काॅलेजमध्ये शिकणारे सहा मित्र बारावीच्या परीक्षेचा पेपर देऊन कासारसाई धरणावर फिरायला आले होते. हे मित्र पाण्यामध्ये उतरले असता त्यापैकी विनय आणि आरिष यांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.

शिरगाव पोलीस स्टेशनचे काॅन्स्टेबल समाधान फडतरे, स्थानिक नागरिक राजाराम केदारी यांच्यासह वन्यजीव रक्षक टीम मावळचे नीलेश गराडे, शुभम काकडे, गणेश मिसाळ अंकुश नागरगोजे, आकाश पवार, संतोष गोपाळे, सुरज शिंदे यांनी दोन तास अथक प्रयत्न करुन मृतदेह पाण्याबाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.