Maval : वन विभागाच्या जागेतील कामांचा अडसर होणार दूर

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी (Maval)उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची वन विभागाच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील विकास कामांना गती देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपवनसंरक्षक यांनी दिले. यामुळे वन विभागाच्या जागेतील विकास कामांचा अडसर दूर होणार आहे.

मावळ तालुका निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. (Maval)त्याचप्रमाणे वन विभागाच्या जागाही मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पाणी योजना अशी मुलभुत कामे करताना वनविभागाच्या हद्दीचा किंवा परवानगीचा अडसर येत असतो. त्यामुळे अनेक गावांमधील विकासकामे खोळंबतात. मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील बहुतांश विकासकामे रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Vadgaon : माजी उपसरपंच एकनाथ गाडे यांचा आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरव

या अनुषंगाने आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामे सुरु असलेल्या काही गावात वन विभागाच्या जागा आहेत. वन विभागाची परवानगी न घेता कामे पूर्ण होणे शक्य नाही. त्‍यामुळे वन विभागाने सहकार्य करुन लवकरात लवकर परवानग्या द्याव्यात, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली. यावर वन विभागाकडून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळणार आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनांमधील पाण्याची टाकी, पाईपलाईन वन विभागाच्या हद्दीत येत असतील,तर त्या गावातील ग्रामसभेचा ठराव व मागणी पत्र दिल्यानंतर पुढील कामांना परवानगी देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये या अडचणी असतील त्यांनी पुढील आठ दिवसात संबंधित कामाचे मागणी पत्र व ग्रामसभेचा ठराव तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयात देण्याचे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.