Pimpri News: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन द्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, तसेच साहित्य चळवळ वाढीस प्रोत्साहन मिळेल या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा स्थापन होवून 30 वर्षे झाली आहेत. 89 वे साहित्य संमेलनही शहरात आयोजित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कर्यालयासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे.

सध्यस्थितीला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्यालय बिजलीनगर येथे भाड्याच्या जागेत आहे. एका गाळ्यात हे कार्यालय असल्यामुळे याठिकाणी कार्यक्रम घेण्यास किंवा बैठका घेण्यास अडचण होते. पिंपरी-चिंचवड शाखेचे शहरात 400 सभासद आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाने वारंवार जागा उपलब्ध करुन देणेबाबत पाठपुरावा केला. मात्र, गेल्या 5 वर्षांपासून हा विषय रखडलेला आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशी पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात साहित्य चळवळ रुजविण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे योगदान आहे. 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाने पिंपरी-चिंचवड शाखेचे महत्त्व लक्षात आले त्यामुळे आगामी काळात साहित्य चळवळीला चालना मिळाली.

यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेला जागा उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.