Pune News : तीन दिवस शोधाशोध करूनही काम न मिळाल्याने महिलेची आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी

एमपीसी न्यूज – नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर कर्नाटक मधून पुण्यात आलेल्या महिलेने काम शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु शोधाशोध करूनही काम न मिळाल्यामुळे या महिलेने मुळा-मुठा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सतर्क असलेल्या पोलिसांमुळे या महिलेला जीवदान मिळाले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव नागम्मा मलिक कांबळे (वय 50) असे आहे.

नागम्मा या मूळच्या कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील कुरूळी गावच्या रहिवाशी आहेत. पती सोबत भांडण झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्या पुण्यात आल्या होत्या. येथे आल्यानंतर त्यांनी काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तीन दिवस शोधाशोध करूनही काम न मिळाल्यामुळे त्या नैराश्यात गेल्या. नोकरी न मिळाल्यामुळे आणि कुटुंबासोबत झालेल्या भांडणामुळे त्यांनी मुळा-मुठा नदीत जीव देण्यासाठी उडी मारली. उडी मारल्यानंतर नदीतून त्या वाहत जात असताना एका नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, येरवडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पर्णकुटी पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने वाहत जाणाऱ्या या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.