Pune News : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीकडे विधानसभेत आमदार शिरोळे यांनी वेधले लक्ष

एमपीसी न्यूज – पुणे विद्यापीठ चौकातील नवीन उड्डाणपुलाचे काम संथ गतीने होत असून नागरिकांना रोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे.याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले.

या उड्डाणपुलाच्या कामाशी संबंधित प्रशासनाने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवावे आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासंबंधीचा कालावधी निश्चित करावा, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले. हा चौक पुण्यातील पाषाण, सूस, बालेवाडी, बाणेर, औंध, बोपोडी, सांगवी, हिंजेवाडी अशा विस्तारलेल्या उपनगरांशी जोडला जातो.

शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागांना जोडणारा हा वाहतूक मार्ग आहे.येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केवळ याच चौकाचा विचार न करता गर्दीच्या वेळी ब्रेमेन चौक, पाषाण चौक, बाणेर चौक येथपर्यंत नियोजन करणे आवश्यक आहे.युनिव्हर्सिटी सर्कल हे पुण्याचे एक प्रमुख एंट्री पॉइंट आहे.शिवाजीनगर – हिंजवडी पुणेरी मेट्रो आणि नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुलभ करण्यासाठी पूर्वीचा (चुकीचा डिझाइन केलेला) उड्डाणपूल 2 वर्षांपूर्वी खाली आणण्यात आला होता. नवीन इंटिग्रेटेड उड्डाणपूलाचे बांधकाम अतिशय  संथ गतीने चालू आहे. आज काल बालेवाडी वरून विद्यापीठाकडे पोहोचयला आता जवळपास 90 मिनिटे लागतात आणि युनिव्हर्सिटी सर्कल ते संचेती हॉस्पिटलपर्यंतच्या छोट्या पॅचला  45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. ही वाहतूक कोंडी संपूर्ण पश्चिम पुण्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत आहे, ज्यामुळे सर्व नागरिक आणि व्यवसायांना प्रचंड त्रास होत आहे.

गेल्या ३ महिन्यांत पावसाळा आणि इतर कारणांमुळे गर्दी झपाट्याने वाढली आहे.पुणे वाहतूक पोलिस, म.न.पा, पीएमआरडीए, विभागीय आयुक्त आणि बांधकाम कंत्राटदार टाटा यासह सर्व संबंधित विभाग एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, दुर्दैवाने त्यात सातत्याचा अभाव आहे.

पुणेरी मेट्रोचे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास 3 वर्षे लागतील, म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे की एकाखात्याने प्रकल्पाची जबाबदारी घेऊन वेळेवर बांधकाम, पर्यायी मार्गांची अंमलबजावणी, भूसंपादन,रहदारी संबंधित निर्णय आणि इतर कामांसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करावे.

ही एक सतत विकसित होणारी प्रक्रिया आणि प्रकल्प आहे आणि शहर आणि नागरिकांप्रती सहानुभूती ठेवून परिश्रमपूर्वक हाताळले जाणे आवश्यक आहे.

सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत वाहतुकीचे नियोजन चौकाच्या अलीकडेच दोन ते तीन किलोमीटर पर्यंत करावे. सेनापती बापट रस्ता, गणेश खिंड रस्त्यावरही वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज ठेवून सूक्ष्म नियोजन केले जावे.असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

आमदार शिरोळे यांच्या सूचनांचा विचार करून प्रशासकीय बैठकीत त्यांना सहभागी करून घेतले जाईल, असे आश्वासन शासनाच्यावतीने कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.