Chinchwad News : मोबाईल ब्लेडसारखे आहे, लक्षात ठेवा एक कृती महागात पडू शकते :-पोलीस निरीक्षक संजय तुंगार

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय सायबर सुरक्षा जागरुकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा समवेत प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, संस्थेच्या खजिनदार डॉ.भूपाली शहा, उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, पिंपरी चिंचवड सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, पोलीस शिपाई जितेश बिच्चेवार, क्वीक हील फाऊंडेशनच्या सुगंधा दाणी कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय तुंगारे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे, पोलीस शिपाई जितेश बिच्चेवार, सुगंधा दाणी यांच्या स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देवून गौरविण्यात आले.

पोलीस निरीक्षक संजय तुंगारे म्हणाले, “आजच्या युगात मोबाईल, इंटरनेटमुळे मानवी जीवन सुलभ झाले असते तरी फसव्या व अपुर्‍या माहितीमुळे तोटेही जाणवू लागले आहे.” सायबर व डिजीटल तंत्रज्ञानाशी येणारा आपला संबंध वाढू लागला आहे.कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण संदेशवहन, नोकरी, बँकेचे व्यवहार, मनोरंजन, खरेदी, ई-मेल, व्हॉट्सअप, कर्ज काढणे, पैशाच्या व्यवहारामुळे आजच्या युगात अनेकांचा इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ईमेल, व्हॉटसअप चॅटींग करताना काळजी घेतली नाही, तर अमिषाला बळी पडणे आदी बाबींमुळे जीवनच धोकादायक स्थितीतही आले आहे.

सायबर युग गतीने वाढले आहे.त्यात उणीवा देखील जाणवू लागल्या आहेत.यासाठी ऑनलाईन अनोळखी मित्र, लोकांबरोबर मैत्री करू नका, अनोळखी अज्ञात लोकांनी पाठविलेले ईमेल उघडून पाहू नका, फेसबुकवर परिचित खात्रीशीर असेल तरच, चॅटींग करा, सुरक्षितता, जागरुकता महत्वाची असून ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये फसवणूक होण्याचा कमी धोका आहे.पोस्ट करताना पडताळणी करा, खात्री करा, आज अनेक तरुण मुले, मुली याला बळी पडतात.मोबाईल वापरणे जेवढे सोपे आहे.तेवढे जोखमीचे देखील आहे.पोलीस देखील तुमच्यावर अप्रत्यक्ष लक्ष ठेवून असतात.एकदा चुकीची पोस्ट केली तर, पोलीसांसमोरही काही एक चालत नाही. तुम्ही केलेल्या कृतीचे परिक्षण सायबर गुन्हे शाखेत पाहिले जाते. विद्यार्थ्यांनो स्वतःचे कौटुंबिक फोटो इतरत्र अनोळखींना शेअर करू नका, लक्षात ठेवा कष्ट न करता काही मिळले तर त्यापासून धोकाही उद्भवतो यासाठी काळजी घ्या, आयुष्यात सहजासहजी कुणालाच काही मिळत नाही.

पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे म्हणाल्या, ऑनलाईन शॉपिंग करताना एचटीटीपीएस संकेत स्थळाचाच वापर करा, ते सुरक्षित आहे.बनावट खोट्या प्रोफाईल बनवून सायबर चोरटेकरवी चांगल्या व्यक्तिची बदनामी केली जाते. एटीएम मशीनवर पैसे काढताना मशीनचे निरीक्षण करा, विवाह विषयक संकेत स्थळावर फसवणूकीच्या उद्देशाने गुन्हेगार खोट्या आकर्षक प्रोफाईल बनवतात. यासाठी उघड्या डोळ्यांनी बारकाईने बघण्याची प्रत्येकाला गरज आहे. लक्षात ठेवा, नोकरीसाठी कधीच पैसे भरावे लागत नाही. ही खात्री मनाशी बाळगा, इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा पासवर्ड वेळोवेळी बदला, आपला ओटीपी कोणाला शेअर करू नका, यावेळी पोलीस शिपाई जितेश बिच्चेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, पोलीसांकडे सुमारे सहा हजार तक्रारी आल्या आहेत विद्यार्थ्यांनो याची व्याप्ती लक्षात घ्या, सेल्फी एकमेकांना पाठवता कशासाठी असले प्रकार कशाला करता. एक आज दिवसीय सायबर सुरक्षा जागरुकता कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधिकार्‍यांनी केेलेले मार्गदर्शन प्रत्येकाने लक्षात ठेवा. नवीन युग आले असले तरी, मोह टाळा ज्या गावाला आपल्याला जायचे नाही, त्या गावाचा विचार का करता असा सवाल डॉ. दीपक शहा यांनी विद्यार्थ्यांना केला. ऑफलाईन मित्र भरपूर आहेत, मग ऑनलाईनचा विचार का करता प्रत्येकाने ऑफलाईन आयुष्य जगा, आभासी जगातून बाहेर या असे वडीलकीच्या नात्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेच्या खजिनदार डॉ.भूपाली शहा यांनी फेसबुक, इंटरनेटच्या आभासी दुनियेतून बाहेर या, सावध राहून काळजी घ्या, असे आवाहन केले.एक दिवसीय सायबर सुरक्षा जागरुकता कार्यशाळेचे स्वागत पर मनोगत उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. उज्ज्वला फालक यांनी केले तर, आभार मुख्य समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. पुनम कांकरीया, प्रा.ऋषिकेश चिकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.