Cinema : चुकीला माफी नाही…नाहीच !!! अर्थात दगडी चाळ 2

दगडी चाळ 2 हा चित्रपट नुकताच पाहण्यात आला, खरतर पहिला भाग पाहिल्यानंतर उत्सुकता होती,की याचा दुसरा भाग निघू शकतो का? अशा काय काय शक्यता असतील ज्या आपल्याला खिळवून ठेऊ शकतील? सूर्या म्हणजेच अंकुश चौधरी साकारत असलेल्या पात्राचे पुढे काय झाले असेल, कलरफुल पात्र असलेल्या सोनल अर्थात  पुजा सावंत आणि अंकुश चौधरी यांची रोमहर्षक प्रेमकहाणी पुढे गेली असेल का? त्यांच्या संसारावर भूतकाळामुळे काही विघ्न तर आली नसतील ना? तसेच या सगळ्या चित्रपटाचा मुख्य भाग म्हणजे डॅडी अर्थात अरुण गुलाब गवळी यांच्या प्रसिद्ध झालेल्या संवादाचे (“चुकीला माफी नाही” ) पुढे काय झाले? या संवादाप्रमाणे अजून काय काय घटनाक्रम घडला असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या चित्रपटात निश्चितच मिळतात.

दोन तास 13 मिनिटे चाललेल्या या चित्रपटात अनेक घटना येत राहतात आणि जातात.जेव्हा जेव्हा मकरंद देशपांडे कृत डॅडी म्हणजेच अरुण गुलाब गवळी हे पात्र पडद्यावर येते.अक्षरश: सहजतेने तो संपूर्ण 70 एम एम पडदा व्यापून टाकते.त्या पात्राचा प्रभाव इतका आहे, की सिनेमा संपल्यावरही आपल्या डोळ्यासमोर हीच प्रतिमा तरळत राहते.ह्याच पात्राच्या निमित्ताने सैद्धांतिक राजकारण की सध्याचे चालू असलेले मतलबी राजकारण याची वास्तवदर्शी प्रतिमाच या चित्रपटात उभी केली आहे.राजकारणापासून आणि गुंडगिरीपासून तुम्ही आम्ही दूर जाऊ शकत नाही,हेच या चित्रपटातून सांगायचे असावे.विशेषत: ज्यांचा भूतकाळ या सगळ्यातून गेलेला आहे.जे कधी तरी पूर्वी या दलदलीत होते, आणि आता ते स्वतंत्र जीवन जगू पाहत आहेत, जरूरी नाही, की ती दलदल तुम्हाला पुन्हा बोलवणारच नाही.कधी कधी तर तुमच्याही नकळत तुम्ही राजकरणात अनपेक्षितपणे ओढले जाता, तुम्हाला कळतसुद्धा नाही. आणि जेव्हा तुम्ही या दलदलीत असता, तुमचा परिवारही भरडले जाऊ शकतात.त्यांचा काहीही दोष नसताना त्यांचा बळी ही जाऊ शकतो. राजकारणाचे हे भीषण रूप आपल्यासमोर अनपेक्षितपणे येते.आणि आपली दुनियाच हादरून जाते.

बर यात एक ट्विस्ट ही आहे बर का, जो आपल्याला वाईट व्यक्ति वाटतो, जरूरी नाही की तो वाईटच असेल, कदाचित तो तुम्हाला चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी मदतच करत असेल.दुसर्‍या बाजूला जो चांगुलपणा दाखवतोय, तुमचा मित्र बनून मदत ही करू पाहतोय, तोच खरतर तुमचा असली शत्रू असून तुम्हाला चक्रव्यूहात ढकलतोय, आणि तुमचा बळी द्यायची तयारी करतोय. आणि याच सगळ्या शक्यता या चित्रपटात व्यवस्थित तपासून पाहिल्या गेल्या आहेत. मित्र असेल तो शत्रू असू शकतो अन जो शत्रू वाटतोय तोच खरा मित्र असेल. हेच या चित्रपटाचे मुख्य वाक्य असायला हवे.

या सिनेमाच्या बाबतीत एक गम्मत अशी आहे की सिनेमाच्या पहिल्या भागापेक्षा मध्यंतरानंतरचा भाग अधिक प्रभावी आणि गतिमान झाला आहे.पहिला भाग काही ठिकाणी उगीचच रेंगाळतो.विशेषत: तिथे गरज नसताना जी सूर्या आणि सोनलची जी प्रेमकहाणी रंगवली आहे.तिच्यावर कात्री मारून अरुण गवळी आणि त्या बाबतीतली गोष्ट आपल्याला अधिक रोचक वाटते. कारण या कथेत सूर्याला परत दगडी चाळीत आणणे यासाठी केल्या गेलेल्या करामती विशेष औत्सुक्याच्या ठरतात. जर त्या अधिक प्रमाणात,कलात्मक पद्धतीने पहिल्या भागात दाखवल्या गेल्या असत्या तर हा चित्रपट अधिकच प्रभावी झाला असता असे वाटून जाते.अर्थात सिनेमाच्या संपूर्ण गणितांचा विचार कदाचित चित्रकर्त्यांनी केलेला असू शकतो. पण एक रसिक म्हणून ही गोष्ट खटकते.

अभिनयाच्या बाबतीत सगळ्यांचीच कामे उजवी झाली आहेत.विशेषत: मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडी या पात्राची भूमिका आधी म्हंटल्याप्रमाणे प्रभावी आहेच.तसेच अंकुश चौधरी यांची ही भूमिका फार छान जमली आहे.अंबरीश देशपांडे यांच्या भूमिकेने ही चित्रपटात जान टाकली आहे.यतीन कार्येकर यांनी साकारलेला वकील आणि डॅडीचा उजवा हात गोडबोले हे पात्र अफलातून साकारले गेलेले आहे.अत्यंत सभ्य,अहिंसक वाटणारे पात्र पण शेवटी वेगळेच निघणारे पात्र मिलिंद फाटक यांनी अतिशय उत्तम साकारले आहे.त्यांच्या चेहेर्‍यावर जो सभ्य पणाचा बुरखा आहे, तो कमाल आहे. त्यामुळेच शेवटी येणारा ट्विस्ट अंगावर येतो.अभिनेते अशोक समर्थ यांची भूमिका ही कमाल झाली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाचे परिणामकारक लेखन केले आहे मच्छिंद्र बुगाडे आणि संजय जमखिंडी यांनी.तर संकलन केले आहे फेजल महाडिक यांनी.तर पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांनी दिले आहे.

एकूणच हा चित्रपट दर्दी सिनेरसिकांनी एकदा तरी बघायलाच हवा असा झाला आहे. या दगडी चाळीची गोष्ट प्रत्येकाने अनुभवायलाच हवी.

इतकेच ….

लेखक : हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.