Pune News : मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामाची आ. सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान चालू असलेल्या भुयारी मार्गाची पाहणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज बुधवारी केली आणि भुयारी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे आ. शिरोळे यांनी यावेळी सांगितले.

शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गामध्ये मेट्रोची 5 स्टेशन्स होणार असून शिवाजीनगर सिव्हील कोर्ट येथील स्टेशनच्या कामाची पहाणी आ. शिरोळे यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. शिवाजीनगर बस स्थानक आणि शिवाजीनगर सिव्हील कोर्ट या भुयारी स्टेशनचे काम जून 2022 पर्यंत पूर्ण होईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आ. शिरोळे यांना सांगितले.

शिवाजीनगर सिव्हील कोर्ट ते स्वारगेटला जाणारा मुठा नदी खालील मेट्रोचा भुयारी मार्ग जमिनीच्या पातळीपासून सुमारे 30 मीटर खाली बनविण्यात येत आहे. तो नदीच्या तळाच्या 10 मीटर खाली आहे. भुयारी मार्गाचे काम ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येत आहे. मेट्रोचे काम अतिशय वेगाने चालू आहे, याबद्दल आ. शिरोळे यांनी समाधान व्यक्त केले.

पुण्याच्या मेट्रोला 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. या कामाचे प्रत्यक्ष परिणाम पुणेकरांना दिसू लागले आहेत. पुणेकरांनी भाजपवर विश्वास दाखविला त्याची ही पावती आहे, अशी प्रतिक्रिया आ. शिरोळे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.